प्रवीण ठाकरे
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लीम धर्मातील व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे.
मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनाच्या नियमांनुसार, मंदिरात इतर धर्माच्या लोकांना प्रवेश करण्याची परवानगी नसताना असा प्रकार घडल्याने याठिकाणी वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटकही केल्याची माहिती समोर आली. आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करून तिथे धूप, चादर आणि फुले चढवण्याचा ते प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.
पण, हे आरोप मुस्लीम गटाने फेटाळून लावले असून मंदिराच्या पायरीवर धूप फिरवण्याची परंपरा असल्यामुळेच संबंधित व्यक्ती त्याठिकाणी गेल्या होत्या, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकाराचा एक व्हीडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू असून राष्ट्रीय माध्यमांनीही या बातमीची दखल घेतल्याचं दिसून येतं.
पण, त्र्यंबकेश्वर मुस्लीम धर्मीयांनी पायरीवर धूप फिरवण्याची प्रथा आहे किंवा नाही, या प्रश्नावरच ही संपूर्ण चर्चा येऊन थांबत असल्याचं दिसून येतं.
शिवाय, या प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येत असून याला राजकीय वळण मिळत असल्याचंही दिसून येत आहे.
हे संपूर्ण प्रकरण काय आहे, मुस्लीम गट करत असलेला दावा योग्य आहे की अयोग्य आहे, या सर्वांचा घेतलेला हा आढावा -
नेमकं काय घडलं?
त्र्यंबक गावातून शनिवारी (13 मे) संदल मिरवणूक निघाली होती. त्यात 25 ते 30 जण सहभागी झाले होते.
वाजतगाजत आलेली मिरवणूक रात्री पावणेदहा वाजता मंदिराच्या उत्तर महाद्वाराजवळ थांबली. मंदिर बंद होण्याची वेळ असल्याने भाविक प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते.
मिरवणुकीतील एका युवकाच्या डोक्यावरील टोपलीत फुले होती. पायरीजवळ धूप दाखविण्यासाठी त्याच्यासह काही जण पुढे गेले. त्यांना प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी रोखले.
या घटनाक्रमाचे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांकडून भ्रमणध्वनीव्दारे चित्रीकरण करण्यात आले. याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.
प्रवेश करण्यावरून काहीवेळ गोंधळ झाल्यानंतर मिरवणूक पुढे निघून गेली, असं लोकसत्ताने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
याप्रकरणी मंदिरातील पुरोहित आणि देवस्थानने तक्रार केली आहे. याद्वारे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून या घटनेची सखोल चौकशीची मागणी देवस्थानने केली आहे.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अकील युसूफ सय्यद, सलमान अकील सय्यद, मतीन राजू सय्यद आणि सलीम बक्षू सय्यद या चार जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी दिली.
चौकशीसाठी SIT ची स्थापना
त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर असल्याची तक्रार पुरोहित संघाने केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन ट्विट करण्यात आलं आहे.
त्यानुसार, "त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत."
या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत.
ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, असं फडणवीसांनी सांगितलं.
गेल्या वर्षीही एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती, तेव्हा यंदाच्या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या अशा दोन्ही वर्षांच्या घटनांची चौकशी SIT कडून केली जाईल.
धूप दाखवण्याच्या प्रथेबाबत दावे-प्रतिदावे
त्र्यंबकेश्वर येथील धूपदरम्यान झालेल्या वादानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर समिती देवस्थान ट्रस्टने याबाबत एक पत्र पाठवून त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार दाखल केली.
मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनानुसार, मंदिरात गैर हिंदूंना प्रवेश करण्याची परवानगी नाही, असा बोर्ड परिसरात लावण्यात आलेला आहे.
पण दुसरीकडे यासंदर्भात एक वेगळा दावाही केला जातो. तो म्हणजे, शहरातील एका दर्ग्यात दरवर्षी संदल मिरवणूक काढली जाते.
ही मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाकडे येते, त्यावेळी सेवेकरी दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला धूप दाखवतात. यानंतर ते पुढे मार्गस्थ होतात, असं संदल आयोजकांनी म्हटलं.
ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून त्या दिवशीही आम्ही धूप दाखवण्यासाठीच आलो होते.
मंदिरात प्रवेश करण्याचा आमचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण मुस्लीम गटाच्या वतीने करण्यात येत आहे.
संदलचे आयोजक मतीन सय्यद यांनी याबाबत बोलताना सांगितलं, "आम्ही दरवर्षी ही प्रथा पार पाडतो. दरवाजाच्या बाहेरूनच धूप दाखवली जाते. आम्ही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही."
ते म्हणतात, "दरवर्षी संदल उर्स निघाल्यानंतर ती मंदिराकडे येते. संदर उर्स पुढे चालत असतो. दरम्यान दोन-तीन जण मंदिरासमोर येऊन धूप दाखवतात. आम्ही देवाबाबत आस्था ठेवतो, म्हणून ही प्रथा केली जाते. आम्ही मंदिरात घुसण्याचा प्रयत्न का करू?"
"या प्रकारामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. असा संदेश जाऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे, असं सय्यद यांनी म्हटलं.
ज्यांच्या डोक्यावर चादर धरून संदल मिरवणूक निघाली होती, त्या सलीम सय्यद यांनी आपल्या कृतीविषयी बोलताना म्हटलं, "त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सर्व नियम मला लहानपणापासून ज्ञात आहेत. माझे वडील मिरवणुकीवेळी पायरीजवळ धूप दाखवून निघून जात असत. आजवर आपण तसे केले होते. यावेळी मात्र त्यास वेगळे वळण मिळालं. शनिवारी कुणाचाही मंदिरात प्रवेश करण्याचा वा चादर चढविण्याचा उद्देश नव्हता," असे सलीम यांनी म्हटलं आहे.
मात्र, देवस्थानचे प्रमुख पुजारी आणि विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी अशा काही प्रथा नसल्याचं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "गेल्या वर्षीही संदल मिरवणुकीत असा प्रकार घडला होता. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
"भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज आहे," असंही डॉ. शुक्ल यांनी म्हटलं.
पूजा साहित्य, नारायण नागबळी विधीसाठी लागणारे कपडे, प्रसाद, भांडी विक्रीची अन्य धर्मियांची दुकाने आहेत. दरवर्षी त्यांच्याकडून दोन ते तीन वेळा संदल, उरुस काढला जातो. मात्र यापूर्वी कधीही असे घडले नव्हते, असे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष आणि देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी म्हटले आहे.
स्थानिक रहिवासी सुरेश गंगापुत्र यांनी घडल्या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणतात, "आमची या परिसरात छोटी-मोठी दुकाने आहेत. आम्हाला आठवतं तेव्हापासून आम्ही हे पाहत आलो आहोत. येथील मुस्लीम त्र्यंबक राजाला मानतात. त्याला धूप-आरती देतात. त्यांची ती परंपरा आहे.
यावेळीही त्यांनी ते केलं. पण ते यावेळी आतमध्ये गेले, हे मी मान्य करतो. ते गर्दी होती म्हणून काहीसं आत गेले. पण त्यांना पोलिसांनी आत जाऊ द्यायला नको होतं, चौकातूनच करा, असं सांगायचं. तिथले सुरक्षारक्षक काय करत होते?
या प्रकरणाचा दोष उगाच हिंदू-मुसलमानांवर द्यायचा. खरे दोषी कोण आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. सय्यद कुटुंबाचे व्यवसाय त्र्यंबकेश्वरशी निगडीतच आहेत. नारायण नागबलीला जे धोतर-सोवळे लागतात, ते विकण्याचा व्यवसायच ते करतात, मंदिरावरच ते अवलंबून आहेत, असं गंगापुत्र यांनी म्हटलं.
येथील शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनीही या प्रकरणावरून वाद निर्माण केल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
त्र्यंबकेश्वरमध्ये वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लीम धर्मीय गुण्यागोविदांने राहतात, आजवरच्या इतिहासात असा वाद कधीच निर्माण झाला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "याबाबत खूपच भडक बातम्या दाखवण्यात आल्या. त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात कधीच धार्मिक कार्यक्रमांना गालबोट लागलेलं नव्हतं. धूप प्रथेबाबत काही लोक म्हणतात की आधीपासून हे केलं जात होतं, काही जण म्हणतात, तसं केलं जात नव्हतं.
"संदलदरम्यान धूप दाखवण्याच्या प्रथेवर कुणाचा आक्षेप असेल तर ही प्रथा बंद करू, असं संदल आयोजकांनी मान्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार, कधी पायरीपर्यंत जाऊन कधी बाहेरून धूप देण्यात येत होती. गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे मिरवणूक झाली नाही, पण आता मिरवणूक पुन्हा सुरू झाली होती. पण इथून पुढे पुजाऱ्यांची इच्छा नसल्यास धूप आरती करणार नाही, असं आयोजकांनी म्हटलं आहे."
"हे प्रकरण विनाकारण वाढवून-चढवून मांडलं जात आहे. त्यावर माध्यमांनीच बंधन घालावं, असं शेख यांनी म्हटलं.
वादात इतरांची उडी आणि राजकारण
हा वाद समोर येताच विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आणि मतमतांतरे यासंदर्भात पाहायला मिळत आहेत.
या प्रकरणावर धार्मिक संघटना आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
विश्व हिंदू परिषद या संघटनेने या प्रकारावर आक्षेप घेत याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
विहिंपचे केंद्रीय प्रवक्ते श्रीराज नायर या प्रसिद्धीपत्रकात म्हणतात, "हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या 12 ज्योतीर्लिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात मिरवणुकीनंतर काही जिहादी मानसिकतेच्या मुसलमान युवकांनी शिरण्याचा, प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या सावधानतेमुळे व सतर्कतेमुळे तो असफल झाला. व पुढील अनर्थ टळला. मागील वर्षीही असाच असफल प्रयत्न झाला होता.
प्रसिद्धीपत्रकात पुढे लिहिलंय, "देशभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अनेक मंदिरांमध्ये मुसलमानांच्या माध्यमातून विवाद उत्पन्न करण्याचा व कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
"या जिहादी मानसिकतेचा इतिहास बघता केवळ मंदिरच नव्हे तर हिंदूंच्या मालमत्तेवर विवाद उत्पन्न करून कब्जा करण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहेत.हे एक मोठे षडयंत्र असावे असे आम्हाला वाटते, असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
तथापि, या प्रकरणी संबंधित युवकांवर गुन्हे दाखल करून व अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे.
तर, नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी या प्रकारानंतर निर्माण झालेल्या वादावरून महाराष्ट्र सरकार आणि भाजपवर टीका केली.
ते म्हणाले, "त्र्यंबकेश्वर मंदिरात वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. पण त्याला वेगळं वळण दिलं गेलं आहे. दोन धर्म मिळून काही करत असतील, तर ती चांगलीच गोष्ट असते.
"फक्त मतांसाठी एकमेकांविरोधात लढाया लावणं बरोबर नाही. निवडणुका येतील तसं वातावरण धार्मिक केलं जाईल. कर्नाटकात भाजपने हेच करण्याचा प्रयत्न केला होता."
"त्र्यंबकेश्वर मंदिरात आतापर्यंत अनेक सिनेमांचं शूटिंग झालं आहे. त्यावेळी आलेला व्यक्ती हिंदू आहे की मुस्लीम हे कोण पाहतं, आता फक्त हे ध्रुवीकरणासाठी सुरू आहे," असंही भुजबळ यांनी म्हटलं.
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
ते म्हणाले, "त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. उरुसचं धूप देवांना दाखविण्याची प्रथा आहे. त्यांनी मंदिराच्या गेटवर जाऊन देवांना धूप दाखविले. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नव्हता."
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या SIT वरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली.
"RSSचा प्रचारक प्रमुख पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. कुरुलकर प्रकरण हे सर्व भाजपच्या संबंधित आहे, तिथे SITची स्थापना करा आणि चौकशी करा. हनी ट्रॅपकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि शेवगाव सारख्या दंगली घडविल्या जात आहेत. मुस्लिमांवर अत्याचार करणे ही आमची परंपरा नाही," असं राऊत यांनी म्हटलं.
यावर भाजप अध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणतात, "आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात पुरातन काळापासून केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो ; तशी स्पष्ट सूचना उत्तर दरवाजावर लावलेली आहे. तरीदेखील 13 मे च्या रात्री काही मुस्लिमांनी प्रवेशाचा प्रयत्न केला ; यावर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
आमच्या मंदिरात आमच्या धर्मिंयांव्यतिरिक्त इतर कोणाचाही प्रवेश आम्हाला मान्य होणार नाही."
Published By -Smita Joshi