छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवार यांनी वक्तव्य केले त्यानंतर राज्यात सत्ताधारी पेटून उठले आहेत. यावदातच आता पुन्हा जाणता राजा आणि शरद पवार ह्या वादाला तोंड फुटले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना जाणता राजाच म्हणणार अशी गर्जना केली. त्यावर आता राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रक्षेपणासाठी डॉ. अमोल कोल्हे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शरद पवार यांना जाणता राजा ही पदवी दिली जाते. आज देखील छगन भुजबळ यांनी सडेतोडपणे आपली भूमिका मांडत शरद पवार यांना जाणता राजाच म्हणणार अशी गर्जना दिली. मात्र हा वादग्रस्त विषय असून याला भाजपचा विरोध आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावरून नाशिकमध्ये मोठे विधान केले असून ते म्हणाले, जाणता राजा म्हणजे शिवाजी राजा अशी जर कुणी इतरांची तुलना करत असेल, तर स्वतः पवार साहेब सुद्धा ही गोष्ट अमान्य करतील, पण सगळ्या परिस्थितीची माहिती असलेला, जाण असलेले नेतृत्व या भावनेतून म्हटलं असेल तर ती जाण असणं, ही गोष्ट वाईट नाही असे विधान डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाशीही तुलना होत नाही, होऊ शकत नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न करू नये, इतकं स्पष्ट सगळ्या शिवभक्तांचे म्हणणं आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मी एक गोष्ट मानतो की, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहे.
शिवपुत्र संभाजी महानाट्य
डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवपुत्र संभाजी या महानाट्यबद्दल सांगितले ते म्हणाले, नाशिकमध्ये महानाट्यचे 21 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास घरोघरी पोहचवणे हा हेतू असून नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास शालेय अभ्यास क्रमात अभावानेच आहे. अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. 8 जानेवारी पासून तिकीट विक्रीला सुरुवात होईल, सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातील तिकीट दर असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
15 वर्षांनंतर नाशिकमध्ये भव्य अशा महानाट्याचे आयोजन होत आहे.यात संभाजी राजे यांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत प्रवास उलगडला जाईल, त्यामुळे नाशिककरांनी आवर्जून हे महानाट्य बघण्यास यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor