आधी राम मंदिर मग सरकार, अशी घोषणा करत येत्या रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांसह अयोध्येत दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत भाजप राम मंदिर करत नाही तोपर्यंत सत्तेत सहभागी होऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला वाटलं होतं, उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन राम मंदिराची उभारणी करणार, पण त्यांच्या कार्यक्रमात मंदिर उभारण्याबाबत काहीच स्पष्टता नाही. साधी वीट ठेवणार असल्याचाही कार्यक्रम पत्रिकेत कुठेच उल्लेख नाही. उद्धव यांची ही फक्त अयोध्या भेट आहे, असे वर्तमानपत्रांमध्ये छापले गेले आहे, त्यामुळे शिवसेनेचा बार फुसका निघाला असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.राम मंदिर प्रकरणावर बोलाताना ते म्हणाले की, राम मंदिर प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे, न्यायालय त्यावर निकाल देईलच पण विकासाची भाषा करणाऱ्यांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. शिवसेना-भाजप विकासाच्या नावावर जिंकून आले आहेत. आज देशाचा विकास दर घसरला आहे. देशात अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत, अशी सूचना पाटील यांनी केली.