Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

JEE-CET Exam : इंजिनिअरिंगचे प्रवेश कधी आणि कसे होणार?

Webdunia
मंगळवार, 1 जून 2021 (19:30 IST)
दीपाली जगताप
देशातल्या शिक्षण व्यवस्थेनुसार इंजिनीअरिंगसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग केवळ बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून खुले होत नाहीत तर ज्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षांचा डोंगर विद्यार्थ्यांना सर करावा लागतो.
 
पण विद्यार्थ्यांसमोर असा केवळ एकच परीक्षेचा डोंगर नाहीय तर बोर्डाची परीक्षा, JEE mains, JEE Advance, MH-CET अशा अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागतं. विद्यार्थी सांगतात यशस्वीरित्या परीक्षा देण्यासाठी आम्ही सराव केला आहे पण सर्व परीक्षांचा एकाच वेळी सामना करण्याची तयारी केलेली नाही. त्यामुळे सगळ्या परीक्षा एकाच वेळी द्याव्या तर लागणार नाहीत ना? अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
 
बारावीचा विद्यार्थी आर्यन गावडे याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, जेईईची परीक्षा ही सीबीएसई बोर्डाच्या नववी, दहावी, अकरावी आणि बारावी अशा चारही वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. तर सीईटीची परीक्षा ही एचएससी बोर्डाच्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते.
 
"या घडीला ना एचएससीचे वेळापत्रक जाहीर झालं आहे ना जेईई किंवा सीईटी या प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सगळ्याच परीक्षा एकत्र आल्या तर आमचं नुकसान होईल ही भीती आहे."
 
बारावी बोर्डाच्या परीक्षा रखडल्याने राज्यातील इंजिनीअरिंगचे प्रवेश कधी आणि कसे होणार याबाबतही लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा आणि त्यानंतर होणारी MH-CET आणि केंद्रीय पातळीवर होणारी JEE परीक्षा कशा होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे.
बारावीची परीक्षा घेण्याबाबत अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारने कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. पण बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा की प्रवेश परीक्षांची तयारी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे.
 
दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात राज्यात इंजिनिअरिंगचे प्रवेश सुरू होतात. पण गेल्यावर्षी सुद्धा कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सीईटीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात झाली. त्यामुळे इंजिनिअरिंगचे प्रवेश उशिराने सुरू झाले. यंदा परिस्थिती आणखी क्लिष्ट होण्याची शक्यता आहे, कारण यंदा मुळात बारावीच्या परीक्षाच होणार की नाही हे अद्याप ठरलेलं नाही.
राज्यात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी स्वतंत्र CET परीक्षा होत असली बारावी बोर्डात किमान 45% गुण असणं आवश्यक आहे. त्यामुळे CET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी बोर्डाची परीक्षाही तितकीच महत्त्वाची असते. तेव्हा बारावीची परीक्षा, CET आणि JEE या प्रवेश परीक्षांची सांगड शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने घालणार यावर विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंग प्रवेशाचं भवितव्य अवलंबून आहे.
 
CET परीक्षा जुलैमध्ये होणार?
राज्यपातळीवर होणाऱ्या MH-CET परीक्षेचं नियोजन सीईटी सेलकडून केलं जातं. सध्या सीईटी सेलमध्ये परीक्षेची पूर्व तयारी सुरू आहे. गेल्यावर्षी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली होती. यंदा मात्र परीक्षा ऑनलाई होणार की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
MH-CET परीक्षा ही विविध क्षेत्रात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी घेतली जाते. यात इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, कृषी या शाखांचा समावेश आहे. या विषयांच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक क्षेत्राची वेगळी सीईटी घेतली जाते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी साधारण साडेचार लाख विद्यार्थी सीईटी देत असतात.
 
बीई (बॅचलर्स इन इंजिनीअरिंग) आणि बीटेक (बॅचलर्स इन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांसाठी इंजिनिअरिंगच्या जवळपास दीड लाख प्रवेशाच्या जागा आहेत. पण सरकारी आणि नामांकित इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक चुरस असते.
राज्याच्या सीईटी सेलचे प्रमुख चिंतामण जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बारावीच्या परीक्षांचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आम्ही आमचं वेळापत्रक जाहीर करू शकत नाही. यंदा परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन हे सुद्धा आताच सांगता येणार नाही. त्यावेळी जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
 
आम्ही पूर्व तयारी सुरू केली आहे. सीईटी परीक्षांचं वेळापत्रक निश्चित करत असताना विद्यार्थ्यांना काही दिवसांचा कालावधी निश्चित मिळेल याची खबरदारी घेतली जाईल. दरम्यानच्या काळात प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र ही माहिती सुद्धा दिली जाईल."
 
"महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे जूनमध्ये तरी सीईटीची परीक्षा घेणं शक्य नाही. साधारण 15 जुलैच्या आसपास सीईटीची परीक्षा होईल यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्यूदर, पॉझिटिव्हिटी रेट, बरं होणाऱ्यांची संख्या ही वेगवेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध सुद्धा काही जिल्ह्यांत कडक तर काही जिल्ह्यांत शिथिल करण्यात आले आहेत. CET परीक्षा मात्र प्रत्येक जिल्ह्यांत वेगवेगळी होऊ शकत नाही. ही स्पर्धा परीक्षा असल्याने जिल्हानिहाय परीक्षांचा प्रश्नच येत नाही, असंही सीईटी सेलकडून सांगण्यात आलं.
 
इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना एकसमान संधी मिळावी यासाठी ही परीक्षा राज्यस्तरीय पातळीवर घेण्यात येते. त्यामुळे CET राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी होणं गरजेचं आहे, असंही तज्ज्ञ सांगतात.
 
'प्रवेश परीक्षांचे नियोजन लवकर करा नाहीतर…'
कोरोना आरोग्य संकटाचा सामना देश गेल्या वर्षीपासून करत आहेत. ही परिस्थिती अपवादात्मक आणि आव्हानात्मक असली तरी सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने तोडगा काढावा किंवा पर्यायी परीक्षा पद्धती अमलात आणाव्यात अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांची आहे.
मुंबईतील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक वैभव नरावडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "देशात आणि राज्यात कोरोना आरोग्य संकटासारखी अपवादात्मक परिस्थिती असली तरी CET सेल ही प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्ध घेण्यासाठी स्थापन केलेली आस्थापना आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न दूर करणे, परीक्षांबाबत सतत अपडेट्स किंवा ताजी माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवणे, सुरक्षित परीक्षा घेण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी करणे हे त्यांचं काम आहे."
 
ते पुढे सांगतात, "सरकारी शैक्षणिक आस्थापनांनी त्यांचे काम चोख आणि वेळेत केले नाही तर खासगीकरणाला अधिक वाव मिळेल आणि अव्वाच्या सव्वा शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागतील. गेल्यावर्षी सुद्धा परीक्षा आणि प्रवेशांना उशीर झाला. त्यामुळे शेकडो विद्यार्थी ओपन युनिवर्सिटीकडे वळले आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयात हजारोंच्या संख्येने जागा रिक्त राहत आहेत. गेल्यावर्षी इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये चाळीस हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध करून देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे सरकारचे काम आहे,"
 
विद्यार्थ्यांच्या मनातही असंख्य प्रश्नांचा कल्लोळ सुरू आहे. आधीच परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी धडपड सुरू असताना बारावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिकवर्षी केवळ वेळेत निर्णय घेतला नाही म्हणून मोठं नुकसान होऊ नये अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.
 
JEE आणि CET परीक्षेची तयारी करत असलेल्या आर्यन गावडे याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सुरुवातीला राज्य सरकारने सांगितलं एप्रिल महिन्यात बारावीची परीक्षा होईल. म्हणून मी जेईई मुख्य परीक्षा जी फेब्रुवारी महिन्यात झाली ती दिली नाही. कारण मला एचएससी बोर्डाचा अभ्यास करावा लागणार होता. पण एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा झालीच नाही. आता एचएससीचा अभ्यास करायचा की जेईई आणि सीईटीची तयारी करायची असा प्रश्न आहे."
आयआयटीचे प्रध्यापकही सांगतात की इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांत आधी आयआयटीचे प्रवेश होणं सोयीचं असतं. कारण इथे निवड झाली नाही तर सीईटीच्या माध्यमातून सरकारी किंवा खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा की नाही हे ठरवता येतं. पण यंदा या सर्व प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी होण्याची शक्यात आहे.
 
"मला भीती आहे आम्हाला आयआयटी किंवा एखाद्या चांगल्या सरकारी महाविद्यालयाच्या प्रवेशावेळी एका प्रवेशाची तडजोड करावी लागू शकते. कारण सर्व परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाल्या तर जो प्रवेश आधी मिळेल तो सुरक्षित करावा लागेल. यामुळे कदाचित आयआयटीच्या प्रवेशाची संधीही हातातून निसटू शकते. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी योग्य ती खबरदारी घेत लवकरात लवकर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणं गरजेचं आहे."
 
अशी मागणी आर्यन गावडे या विद्यार्थ्याने केली आहे.
 
विद्यार्थ्यांची मागणी काय आहे?
गेल्या महिन्याभरापासून देशभरातील लाखो विद्यार्थी बारावीची परीक्षा रद्द करा अशी मागणी करत आहेत. तर काही विद्यार्थ्यांना वाटतं की बारावीची परीक्षा घ्या मात्र प्रवेश परीक्षा यंदा घेऊ नका. काही विद्यार्थी अशीही मागणी करत आहेत की सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यावा जेणेकरून आम्हाला अभ्यासाचं नियोजन करता येईल.
 
"कोरोनासारखी परिस्थिती असली तरी सरकारने विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं तर आम्हालाही कोणत्या परीक्षांचा अभ्यास प्रधान्याने करायचा आहे याचं नियोजन करता येईल. तसंच वेळापत्रक निश्चित करत असताना लाखो विद्यार्थी जेईई, सीईटी आणि बोर्डाची परीक्षा अशा तीन वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत आहेत याचीही खबरदारी घ्यायला हवी. या परीक्षांचं नियोजन करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय नसला तर एकाच वेळी परीक्षा जाहीर होतील किंवा दोन परीक्षांमधील अंतर कमी असेल. त्यामुळे आम्हाला कदाचित आमच्या आयुष्यातील एखाद्या सुवर्ण संधीपासून मुकावं लागेल. याच कारणामुळे सरकारने आता काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे," असं आर्यन सांगतो.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची परिस्थिती आणखी आव्हानात्मक आहे. एका बाजूला महाविद्यालय बंद आहेत आणि दुसऱ्या बाजूला वीजकपात आणि मोबाईलला रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणाला फटका बसतोय. अशा दुहेरी संकटाचा सामना ग्रामीण भागातील विद्यार्थी करत आहेत. त्यात विद्यार्थी बारावी बोर्डाची परीक्षा देणारा असल्यास त्याच्यासाठी परिस्थितीची काठिण्यपातळी अधिक असल्याचं चित्र दिसून येतं.
 
औरंगाबादमध्ये राहणारा गजानन बिमरोत सैनिक शाळेत शिकतो. तो बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे आणि इंजिनिअरिंगसाठी सीईटी प्रवेश परीक्षेचीही तयारी करत आहे.
 
बीबीसी मराठाशी बोलताना त्याने सांगितलं, "ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. मी ज्या गावात राहतो तिथे आत्ता कोव्हिडची लागण झालेले 15 रूग्ण आहेत. त्यामुळे फक्त ऑनलाईन शिक्षणावरच आम्ही अवलंबून आहोत. पण विज्ञानसारख्या विषयात केवळ ऑनलाईन माध्यमातून व्हीडिओ पाहून संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यात बोर्डाची परीक्षा कधी घेणार हे अजून ठरत नाहीय. बोर्डाची परीक्षा झाल्यानंतरच सीईटीची परीक्षा होणार. तेव्हा फोकस कोणत्या परीक्षेवर ठेवायचा हेच कळत नाही. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यास आम्हाला मदत होईल."
 
इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई मुख्य परीक्षांना सध्या स्थगिती दिली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा केंद्र सरकारने स्थगित केली असून परीक्षा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
 
जेईई मुख्य परीक्षा एप्रिल महिन्याच्या अखेर होणार होती. परंतु कोरोनाची रुग्णसंख्या देशभरात वेगाने वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. तर मे अखेर होणारी परीक्षाही स्थगित करत आहोत, असं परिपत्रक नुकतंच नॅशनल टेस्टिंग एजंसीने जारी केलं आहे.
 
केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचा निर्णय सुद्धा अद्याप जाहीर केलेला नाही. यासंदर्भात 23 मे रोजी देशपातळीवर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विविध राज्यांचे शिक्षणमंत्री सहभागी झाले होते. तेव्हा बारावीची परीक्षा आणि जेईई परीक्षा यांचे निकाल जाहीर होत नाहीत तोपर्यंत आयआयटी संस्थांमधील इंजिनिअरिंगचे प्रवेश रखडणार हे सुद्धा स्पष्ट आहे.
जेईई मुख्य परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची जेईई अडवान्स ही परीक्षा होत असते. जेईई मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीनुसार सुरुवातीचे अडीच ते तीन लाख विद्यार्थी जेईई अडवान्ससाठी पात्र ठरतात.
 
गेल्यावर्षी आयआयटीमधील प्रवेश नोव्हेंबर महिन्यात पार पडले होते. दरवर्षी साधारण हेच प्रवेश जुलै महिन्यात होत असतात. यंदा मात्र या प्रक्रियेला आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
आयआयटी बॉम्बेमधील एका वरिष्ठ विभाग प्रमुखांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही गेल्यावर्षी विद्यार्थ्यांच्या सुट्या रद्द केल्या होत्या. दोन सेमिस्टरच्या मध्ये विद्यार्थ्यांना जी सुटी दिली जाते तसंच डिसेंबर महिन्यात मिळणारी सुटीही रद्द केली होती. कारण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होऊन सेमिस्टर परीक्षा वेळेत घेण्यासाठी असं नियोजन आम्हाला करावं लागलं. कारण मुळात प्रवेशच खूप उशिराने झाले होते."
 
ते पुढे सांगतात, "आयआयटी प्रवेशावर विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश अवलंबून असतात. कारण शेकडो मुलं आयआयटीला प्रवेश मिळाला नाही तर NIIT आणि सरकारी इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आयआयटी प्रवेश यादी जाहीर होईपर्यंत मुलांना वाट पहावी लागते. यात अभ्यासात सरासरी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ शकतात. कारण त्यांना JEE आणि CET दोन्ही परीक्षांची तेवढीच तयारी करावी लागते. जेईईच्या माध्यमातून प्रवेश मिळाला नाही तर ते सीईटीच्या निकालावर अधिकाधिक चांगलं महाविद्यालय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात."
 
त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकार परीक्षांच्या वेळेचे नियोजन आणि प्रवेश प्रक्रियांचा तिढा कसा सोडवणार याकडे लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

कांद्याने रडवले ! 5 वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक भाव, जाणून घ्या किती किमतीला विकली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments