कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वाराणशीच्या दौऱ्याच्यावेळी आणलेले गंगाजल आता राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळी पाठविण्यात येत आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून या गंगाजलाने प्रत्येक ठिकाणी अभिषेक करण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्या मतदारसंघातील कर्जत येथून याचा प्रारंभ झाला. त्यानंतर गंगाजल घेऊन निघालेले वाहन राज्याच्या दौऱ्यावर रवाना करण्यात आले.
वाराणशी दौऱ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या वाराणशीच्या विश्वेश्वराची पूजा, अभिषेक व गंगाआरती त्यांनी केली होती. तेथून त्यांनी गंगाजल आणले आहे.
आता आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्राच्या विविध भागातील धार्मिक व आध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी या गंगाजलाने अभिषेक करण्याची कल्पना त्यांना सुचली. विविध भागातील धार्मिक स्थळांची यादी तयार करून एका विशेष वाहनाद्वारे हे कलश पाठविण्यात आले आहेत.