धर्मवीर आनंद दिघे यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत काम काय केले हे दाखवले आहे. पण, धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथे जाहीर सभेत केले. यावेळी ते म्हणाले की, मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल. या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात ? माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल.