उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत चाललेला विवाद संपला आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
आज विधिमंडळ सचिवांकडे नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीने एकमताने नाना पटोले यांची निवड केली आहे. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाकडून किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकासआघाडीच्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. यात बदल करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह काँग्रेसकडून शुक्रवारी धरण्यात आला. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली. तरीही काँग्रेसचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही सत्तावाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. आघाडीच्या बुधवारी रात्री झालेल्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला, असा निर्णय झाला होता. या बदल्यात राष्ट्रवादीला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळणार होते.
शपथविधीच्या दिवशी मात्र काँग्रेसने या निर्णयात बदल करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला. मात्र, राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली होती. शुक्रवारी पुन्हा काँग्रेसने नव्याने प्रयत्न सुरू केले.