मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली आहे. या आरोपांना समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने उत्तर दिलं आहे. नवाब मलिक वाटेल ते आरोप करत आहेत, त्यांच्या जावई 8 महिने जेलमध्ये होता, त्याला निर्दोष सिद्ध करण्यात मलिक यांनी वेळ घालवावा. समीर वानखेडे जे निष्पक्ष कारवाई करतायत, त्यांच्या अंगावर करप्शनचा एकही डाग नाही, त्याला खोट्या आरोपात फसवण्याचा प्रयत्न करु नये, त्यांना मी हात जोडून विनंत करते. तुम्ही एक मंत्री आहात, मंत्री असल्यासारखे वागा, असं क्रांती रेडकर हिने म्हटलं आहे.नवाब मलिक यांच्याकडून सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप क्रांती रेडकरने केला आहे. क्रांती रेडकरने केलेल्या या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.
समीर वानखडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माझ्या महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं असा सल्ला दिला आहे. तसंच ;आम्ही जर का मागचा इतिहास काढला तर महागात पडेल आणि लक्षात येईल की हमाम मे सब नंगे है' असा इशाराही त्यांनी दिला आहे. पत्नी म्हणून ती तिचं कर्तव्य पार पाडत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.