महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात असंसर्गजन्य आजार म्हणजेच मलेरिया, डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढले असल्याची बाब आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. निती आयोगाने लोकसभेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मागवलेल्या माहितीतून हे स्पष्ट होत आहे.
या माहितीनुसार,२०१८ या वर्षात राज्यात मलेरिया आणि डेंग्यूमुळे सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. या एकाच वर्षात राज्यात डेंग्यूमुळे ४६ तर, मलेरियामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. इतर राज्यांशी तुलना करता हे प्रमाण खूप जास्त आहे. या आकडेवारीमध्ये मलेरियामुळे ६ मृत्यू झालेलं पश्चिम बंगाल आणि डेंग्यूमुळे ३७ मृत्यू झालेलं केरळ महाराष्ट्राच्या खालोखाल आहे.
गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०१६ मध्ये मलेरियाच्या २ हजार ९८३ केसेसची नोंद करण्यात आली होती. २०१७ मध्ये १७ हजार ७१० आणि गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये ९ हजार ३२२ केसेसची नोंद करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रात १० जणांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.