लातूर औसा : तालुक्यातील औसा-तुळजापूर रोडवरील बोरफळ येथे गेल्या तीन दिवसांपासून एक मनोरुग्ण तरुण हातात कोयता घेऊन येणा-या-जाणा-यांवर हल्ला करून हैदोस घालत होता. आज दुपारी औसा पोलिसांसह स्थानिक युवकांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्याचा पाठलाग करणा-यांवर तो कोयत्याने हल्ला करीत असल्याने सर्वांच्याच हृदयाचा थरकाप उडाला होता.
बोरफळ चौकात नेताजी मांजरे या व्यक्तीने शनिवार दि. २२ जुलै रोजी रस्त्यावर थांबलेल्या संतोष कानमोडे या व्यक्तीवर धारदार कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . याबाबत औसा पोलिसात तक्रार दाखल झाल्याने आज औसा पोलिस नेताजी मांजरेच्या शोधात बोरफळ येथे गेले असता दोन्ही हातात दोन कोयते घेवून त्याने राष्ट्रीय महामार्गावर हैदोस घातला.
या मार्गावरून जाणा-या प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून धमकावत होता. यावेळी काही युवकांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याही मागे कोयता घेऊन पळत सुटला. त्यामुळे दहशत पसरली होती. मात्र, त्यावेळी गावातील युवक व पोलिसांनी नेताजीला पकडून ताब्यात घेतले. यावेळी येथील तरुणांनी थेट त्याच्यावर झडप टाकून त्याला पकडले. त्याला वेळीच पकडले नसते, तर विपरित घटना घडली असती, अशी भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून हातात कोयते घेऊन हा मनोरुग्ण बोरफळ परिसरात दहशत माजवत होता. त्याने तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जवळपास २५ पोलिस आणि युवक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या अंगावर तो धाऊन जात होता. शेवटी दोन तरुणांनी धाडस दाखवत त्याला पकडले. त्यामुळे रस्त्यावरून जाणा-यांचा जीव भांड्यात पडला.
Edited By- Ratnadeep Ranshoor