राज्यातील लॉकडाउनबाबत आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
“स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण करोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असं नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.
“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.