Publish Date: Fri, 17 Jul 2026 (16:48 IST)
Updated Date: Fri, 17 Jul 2026 (16:54 IST)
महाराष्ट्र सरकारने राज्यातील पिवळे शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठीची 'मोफत साडी वाटप योजना' बंद केली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २५ लाख गरीब कुटुंबांतील महिलांना यंदाच्या दिवाळीपासून मोफत साडी मिळणार नाही.
योजना बंद होण्यामागची मुख्य कारणे
राज्यावरील वाढता आर्थिक भार, इतर विविध लोककल्याणकारी योजनांचा खर्च आणि शासनाची वाढती वित्तीय दायित्वे पाहता ही योजना पुढे चालू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणि इतर सामाजिक योजनांमुळे तिजोरीवर मोठा ताण आल्याने वस्त्रोद्योग विभागाने या योजनेला कात्री लावली आहे.
माहितीनुसार ही योजना २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. राज्यातील गरीब कुटुंबांना सणासुदीत (दिवाळीत) वस्त्र पुरवणे आणि यंत्रमाग क्षेत्राला आर्थिक चालना देणे, असा या योजनेचा दुहेरी हेतू होता. ही योजना मूळची २०२८ पर्यंत चालणार होती, परंतु २०२३, २०२४ आणि २०२५ अशी सलग तीन वर्षे राबवल्यानंतर २०२६ मध्ये ती कायमची बंद करण्यात आली आहे. या योजनेसाठी सरकार दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करत होते. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे गरीब कुटुंबांमध्ये आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik