राज्यातील पर्यटन वाढीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला आहे.
"विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. त्यातून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्टया सहकार्य केले जाईल. तसेच पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभागामार्फत यासंदर्भात संयुक्तपणे नियमावली तयार करण्यात येईल. स्वागत कक्ष, पर्यटकांचे स्क्रीनिंग, ऑनलाईन बुकींग अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. याविधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजविली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. तसेच ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे", असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.