Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाराष्ट्र एनसीसी पथकाने सलग तिसऱ्यांदा मिळवलेले यश गौरवास्पद

eknath shinde
, शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (09:29 IST)
महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान सलग तिसऱ्यांदा पटकविला आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने मिळवलेले हे गौरवास्पद यश त्यांच्या मेहनतीचे आणि सांघिक कामगिरीचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र छात्र सेना संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग, ब्रिगेडिअर विक्रांत कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
 
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरता, वीरतेचा वारसा आपल्याला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणाच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत. हे तुमचे, लोकांचे सरकार आहे. अशा कामगिरीमुळे विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तुमच्या यशामुळे राज्याचा गौरव वाढला असून भविष्यातही हा बहुमान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी. महाराष्ट्र शासन सर्व सहकार्यासाठी संचालनालयाच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एनसीसी पथकास मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी, शिक्षकांचे आणि एनसीसी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छात्र सैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश पटकावणाऱ्या छात्रसैनिकांना गौरविण्यात आले. एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी आभार मानले.

Edited By -  Ratnadeep ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 10 फेब्रुवारीपर्यंत मांजा वापरावर बंदी