Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; सोलापूरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

Nashik Police
, शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (20:46 IST)
राज्यात नाशिकमधले ड्रग्ज  प्रकरण चांगलेच गाजत असतांना आता नाशिक पोलिसांनी एमडी ड्रग्ज पावडर हे अंमली पदार्थ विकणारा नाशिकचा माफिया सनी अरूण पगारेसह त्याचा साथीदार अंमली पदार्थ खरेदी विक्री करिता चालवित असलेला सोलापूर  येथील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधीच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड पोलीस ठाण्यात  दाखल ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्यात प्रथमता संशयित आरोपी गणेश संजय शर्मा याच्या ताब्यातून १२.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला होता. या गुन्हयाच्या तपासात अंमली पदार्थ हा संशयित आरोपी गोविंदा संजय साबळे व आतिश उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी यांच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती. यावेळी तपासादरम्यान अंमली पदार्थ खरेदी विक्रीचे मोठे जाळे संशयित आरोपी सनी अरुण पगारे (वय ३१, रा. गोसावी वाडी, पगारे चाळ, नवीन बिटको हॉस्पिटलच्यामागे, नाशिकरोड, नाशिक) व त्याचा साथीदार अर्जुन सुरेश पिवाल, मनोज भारत गांगुर्डे, सुमित अरुण पगारे यांच्यामार्फत चालवत असल्याचे तपासात समोर आल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक  करण्यात आली आहे.
 
या संशयित आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान सखोल तपास करतांना मनोज भारत गांगुर्डे यांच्याकडून ०१ किलो २७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व सनी पगारे यांच्याकडून ०२ किलो ६३ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच अर्जुन सुरेश पिवाल याच्याकडून ५८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला आहे. अधिक तपासात हे अंमली पदार्थ हा त्यांचे साथीदार आरोपी यांच्यासोबत संगणमत करून अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना सुरू केल्याचे समोर आले. हा कारखाना त्यांनी कुठे सुरू केला याबाबत माहिती मिळून येत नव्हती. त्यावर विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व सपोनि फड व पथक यांनी अथक परिश्रम घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती संकलित केली. मुख्य संशयित आरोपी सनी पगारे याची सखोल चौकशी केली असता त्याने सोलापूर येथे त्यांचा अंमली पदार्थ निर्मितीच्या असलेल्या कारखान्याबाबत माहिती दिली.
 
संशयित आरोपींनी सोलापूर येथील रासायनिक कंपनी भाडेतत्वांवर घेऊन अंमली पदार्थ निर्मितीचा व खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर पथकाने सोलापूर येथे जाऊन कारखान्यावर छापा टाकला. यात अटक आरोपी व गुन्हयात पाहिजे आरोपी हे सोलापूर येथे अंमली पदार्थाची निर्मिती करीत असलेल्या कारखान्यातून सुमारे ०६ किलो ६०० ग्रॅम वजनाचा सुमारे ०३ कोटी ३० लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यासोबत एमडी पावडर सदृश्य अंमली पदार्थ १४ किलो २४३ ग्रॅम वजनाचा सुमारे ०२ कोटी ८४ लाख ८६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल, ३० किलो वजनाचा कच्चामाल सुमारे ६० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल, अंमली पदार्थ निर्मिती करीता लागणारे द्रव रसायन सुमारे १० लाख रुपये किंमतीचे व सुमारे २५ लाखांचे साहित्य असा एकुण ०७,०२,८६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून अंमली पदार्थ  निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दामदुप्पट रकमेचे आमिष भोवले अन्‌‍ वृद्धाने 17 लाख रुपये गमावले