शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक, भारतीय खाद्य निगमचे गोदाम, शीख धर्मियांचे गुरुद्वारा, रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना आणि शहरापासून जवळच असलेले इंधन प्रकल्प यामुळे मनमाड शहर हे नेहमीच हॉटलिस्टवर असल्याने प्रशासन देखील सदैव सतर्क असते.
शहरातील एका घरामध्ये जबरदस्तीने दोन आतंकवादी शिरल्याची माहिती आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर दिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. संबंधित बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने चर्चेला एकच उधान आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील रेल्वे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 50 युनिट परिसरातून काल सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर अनेक वेळा फोन करून घरामध्ये दोन आतंकवादी शिरले आहेत, तसेच मला मारहाण करून चोरी करीत आहे अशी माहिती रेल्वेच्या इलेक्ट्रिशियन विभागात काम करणाऱ्या अमोल प्रवीण वळवी (वय 40) यांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मात्र घटनास्थळी असा कोणताही प्रकार आढळून न आल्याने मनमाड पोलीस ठाण्यात खोटी माहिती देणाऱ्या रेल्वे कर्मचारी अमोल प्रवीण वळवी याच्या विरोधात पोलीस कर्मचारी सोपान संजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली असून, भा. दं. वि. कलम 177 प्रमाणे कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहेत.
Edited By - Ratnadeep Ranshoor