Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मराठी साहित्य संमेलन: 'विचार न केल्यामुळेच माणूस गुलाम होतो, पारतंत्र्यात जातो' - न्या. चपळगावकर

मराठी साहित्य संमेलन: 'विचार न केल्यामुळेच माणूस गुलाम होतो, पारतंत्र्यात जातो' - न्या. चपळगावकर
, शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (22:57 IST)
स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, चांगल्या साहित्य निर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक असल्याचे विचार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी आज आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.
 
"विचार जर केला नाही तर माणूस हा गुलाम होतो आणि गुलामी केवळ राजकीयच नसते तर अनेक प्रकारची असते," असे न्या. चपळगावकर म्हणाले.
 
"प्रस्थापित लोक हे विचारांना घाबरतात. लोकांनी विचार केला तर ते बंड करतील, आपण जो त्यांच्यावर अन्याय करतो हे त्यांच्या लक्षात येईल म्हणून त्यांना विचारच करू द्यायचा नाही असा प्रयत्न प्रस्थापित लोक करत असतात.
 
"आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी लोक इतरांना विचार करू देत नाहीत, सत्ता ही केवळ राजसत्ताच नसते तर धर्मसत्ता, जात, गट अशा विविध स्वरूपाची असते. ती अबाधित राहावी यासाठी ते तुम्हाला विचार करण्यापासून परावृत्त करतात," असं चपळगावकर म्हणाले.
 
वर्धा येथे होत असलेल्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनात न्या. चपळगावकर म्हणाले की गांधी विनोबाच्या भूमीत आपण आपले स्वातंत्र्य जपण्यासाठी आग्रही असलं पाहिजे.
स्वातंत्र्यासाठी विचार महत्त्वाचे
आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत असं देखील चपळगावकर म्हणाले. त्यासाठी त्यांनी लोकहितवादींचं उदाहरण दिलं.
"लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी विचार मांडला होता की आपण इंग्रजांना हा प्रश्न विचारला असता की जर तुम्ही व्यापारासाठी आला आहात तर सैन्य बाळगण्याची काय गरज आहे. तर ते आपल्यावर राज्य करू शकले नसते.
 
"स्वातंत्र्यापूर्वी निजामाच्या काळात केसरीवर बंदी होती, अनेक राष्ट्रवादी पुस्तकांवर बंदी होती. इंग्रजांनी देखील अनेक पुस्तकांवर देशात बंदी घातली होती. स्वातंत्र्य मिळू द्यायचे नसेल तर प्रस्थापितांकडून नेहमीच विचारांवर बंदी घालण्याचे प्रयत्न केले जातात," असं चपळगावकर म्हणाले.
 
"माणसाचे विचार हेच माणसाच्या प्रगतीसाठी कारणीभूत आहेत. माणसाचे विचार थांबवण्यासाठी अनेक सत्ता असतात, धर्मसत्ता असते, राजसत्ता असते, जात संस्था असते, गटाची सत्ता असते. विचारांना का प्रतिबंध केला जातो," असा सवाल चपळगावकरांनी उपस्थित केला.
 
आपले स्वातंत्र्य आपणच जपायला हवे
चपळगावकर यांनी आपल्या भाषणातून अभावात्मक स्वातंत्र्य आणि भावात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की इसाया बर्लिन नावाच्या एका तत्त्वज्ञाने ही संकल्पना मांडली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये अभावात्मक स्वातंत्र्य म्हणजे अडथळा नसणे.
आपण जे लिहू इच्छितो त्यावर अडथळे नसले पाहिजे, त्यावर बंदी नसली पाहिजे. आणि दुसरं स्वातंत्र्य म्हणजे भावात्मक स्वातंत्र्य हे आपण समजून घ्यायला हवं. व्यक्ती म्हणून आपण स्वतंत्र असलं पाहिजे आणि आपण स्वतंत्र आहोत हे देखील आपण समजलं पाहिजे.
 
अनेकदा आपल्या मनावर दुसऱ्या भावना राज्य करत असतात त्याचा आपण विचार करत नाहीत. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या लेखकाच्या दोन कादंबऱ्या लोकप्रिय होतात. आणि तो लेखक त्याचा साचा ठरवून घेतो.
 
मग तो तशाच दहा बारा कादंबऱ्या लिहितो. तो खरंच स्वतंत्र आहे का? नवीन लिहिण्याचं स्वातंत्र्य हे त्यानेच गमावलेलं असतं दुसऱ्याने नाही. तेव्हा हे दोन्ही प्रकारचं स्वातंत्र्य जपणं आणि अबाधित ठेवणं आवश्यक आहे, असे चपळगावकर म्हणाले.
 
विचारांचे सामर्थ्य
प्रस्थापितांना आव्हान द्यायचे असेल तर विद्येची कास धरणे महत्त्वाचे आहे ही गोष्ट महात्मा फुलेंनी ओळखली होती असं चपळगावकर म्हणाले.
 
"महात्मा फुले यांनी सांगितलं की भिक्षुकशाही कशामुळे निर्माण झाली तर लोक विचार करत नाहीत आणि म्हणून विद्येची कास धरा असा संदेश दिला.
 
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलित आणि अस्पृश्यांना केवळ उन्नतीचा मार्गच नाही दाखवला तर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आपल्या देशातील राज्ययंत्रणेवर झालेला देखील पाहिला.
 
"ज्या लोकांवर अन्याय होतोय त्यांना तर डॉ. आंबेडकरांनी सांगितले की तुमच्यावर अन्याय होतोय त्याचबरोबर त्यांनी अन्याय करणाऱ्या घटकांना देखील ही जाणीव करून दिली की तुम्ही अन्याय करत आहात. इतकं सामर्थ्य हे डॉ. आंबेडकरांच्या विचारात होतं," चपळगावकर म्हणाले.
 
गळचेपीला प्रतिक्रिया म्हणून साहित्य निर्मिती
आपण लेखक कसे झालो याबाबत चपळगावकर यांनी सांगितलं की "मी वकील होतो, प्राध्यापक होतो आणि नंतर पुन्हा वकिली सुरू केली. मला लोक विचारत की तुम्ही साहित्यावर कसं प्रेम करू लागला त्यांना मी सांगत होतो की माझं साहित्यावर प्रेम हे वाचनावरुन निर्माण झालं नाही तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात जी गळचेपी झाली, भाषेची गळचेपी झाली त्याला प्रतिक्रिया म्हणून मी साहित्याकडे पाहू लागलो.
 
"निजामाचं सरकार गेल्यानंतर पहिल्यांदाच आम्हाला मराठी प्रार्थना म्हणता आली. हा आनंद प्रकट करता यावा म्हणून मी साहित्याकडे वळलो.
 
"मराठवाड्यातील स्वातंत्र्याच्या चळवळीबाबत महाराष्ट्रात फारशी माहिती नव्हती ती माहिती सर्वांना व्हावी लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मी स्वातंत्र्याविषयी लिहू लागलो.
 
"दुसरी गोष्ट ही होती की स्वातंत्र्यातील नेत्यांबाबत अनेक गैरसमज होते. ज्या लोकांनी वाचन केलं होतं त्यांच्या मनात तर हे असे गैरसमज नव्हते, पण इतरांच्या मनात होते. जसं की टिळक आणि गांधी यांच्यात टोकाचे मतभेद होते. पण तसं नव्हतं. किंवा नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मतभेद होते. मतभेद होते पण ते लोक संकुचित मनोवृत्तीचे नव्हते ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी लेखन केलं," असं चपळगावकर म्हणाले.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nagaland Election 2023: नागालँडमध्ये NDPP आणि भाजप कडून उमेदवार घोषित