बारावी बोर्ड परीक्षेनंतर शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी लागण्याची आहे. निकाल जरी 12 जून रोजी लागण्याची शक्यता असली तरी त्याआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सीईटी सेलकडून सुरु करण्यात येईल.
सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॅप राऊंड सुरु होतील,असं सीईटी सेलकडून सांगण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन केले जात आहे. यासाठी लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.
एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रात
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.
MHT CET 2023 : परीक्षा कशासाठी घेतली जाते?
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत ही परीक्षा घेतली जाते. अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. एमएचटी सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील उत्तरं द्यावी लागतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्रच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.
Edited by -Ratnadeep Ranshoor