बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्यावरील द्रोणिय स्थिती, 20°N पूर्व-पश्चिम शियर, मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित आहे. परिणामी या चार ते पाच दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह), मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो.
नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी,
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त तसा प्रशासक रमेश पवार यांनी गोदाकाठच्या परिसरात येऊन पाहणी केली. तसेच इथल्या व्यावसायिकांना आपले दुकान इतरत्र हलवण्यासाठी निर्देश दिले आहेत. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सायंकाळपर्यंत पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.
वर्धा- समुद्रपूर तालुक्यात पुलावरील काँक्रिट गेले वाहून, चार गावांचा तुटला संपर्क
वर्धा- समुद्रपूर तालुक्याच्या वडगाव, सावंगी, सायगव्हाण व लोखंडी या चार गावांना जोडणारा पोथरा नदीवरील पुलाचे सिमेंट काँक्रीट वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पहिल्याच मुसळधार आलेल्या पावसामुळे पुलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.पुलावरील रस्ता वाहून गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्याचे नदी नाले दुभडी भरून वाहत आहे. अनेक गावांमध्ये पूर आला आहे. समुद्रपूर तालुक्यातही पावसाने चांगलाच हाहाकार माजावलाय. समुद्रपूर तालुक्याच्या वडगाव पिंपळगाव मार्गांवरील पोथरा नदीच्या पात्राला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याचे सिमेंट काँक्रीट वाहून गेल्याने विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.