महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या निकषात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी एका पदासाठी 12 उमेदवार पात्र ठरविले जायचे. आता एकूण पदांच्या 16 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार असून, त्याचा मोठा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना होणार आहे. नव्या निर्णयानुसार मुख्य परीक्षेत उमेदवारांची संख्या वाढणार असली तरी गुणवत्तेची स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पुर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या 12 पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट ऑफ ठरविले जात होते. आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यापुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या 15 ते 16 पट उमेदवारांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेचे कटऑफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.