Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'MPSCच्या रिक्त जागा 31 जुलै 2021 पर्यंत भरणार'

MPSC vacancies to be filled by July 31
, सोमवार, 5 जुलै 2021 (12:33 IST)
31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या भरणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. त्यामुळे विधिमंडळात यावर चर्चा झाली.
 
याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "एमपीएससी संदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. दीड वर्षांपासून मुलाखती घेतल्या जात नाहीयेत. लोक प्रतीक्षेत आहेत. तरुणाई निराश होतेय. या विषयात सरकार गंभीर नाही."
 
यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी बोलताना म्हटलं, "मुलगा म्हणतो मी मेन्सची परीक्षा पास केली, पण मुलाखत घेतली का? बारा आमदारांची यादी देता आली, पण एमपीएससीचे सदस्य भरता आले नाही? साडे बारा कोटींमध्ये एमपीएससीचा सदस्य होण्याच्या पात्रतेचा एकही माणूस नाही. सरकारचा निर्णय घेण्याविषयीचा आंधळेपणा आम्ही पाहिला आहे."
 
विरोधकांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, "स्वप्नील लोणकर यांची आत्महत्या ही वेदनादायी बाब आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये याविषयी चर्चा झाली. स्वप्नील यांनी 2019मध्ये एमपीएससीची पूर्वपरीक्षा दिली, मुख्य परीक्षेचा निकाल 28 जुलै 2020 रोजी लागला. यात 3,671 पात्र ठरले. 1200 पदांकरता ही परीक्षा होती. दरम्यान एसईबीसी प्रवर्गासाठी 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यामुळे प्रक्रिया थांबवावी लागली, मुलाखती होऊ शकल्या नाहीत."
 
"5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश दिला. यादरम्यान कोव्हिडची साथ आहे. हे महाराष्ट्राला माहिती आहे. सरकारनं गांभीर्यानं ही गोष्ट घेतलीय. सरकार 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या भरणार आहोत. एमपीएससीला स्वायत्तता दिलेली असल्यामुळे जास्त हस्तक्षेप करता येत नाही, पण सरकार योग्य तो निर्णय घेईल," असंही अजित पवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक !पुण्यात दोन युवकांची निर्घृण हत्या