Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई; ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला बेड्या

amruta fadnavis
, शुक्रवार, 17 मार्च 2023 (08:57 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीस अटक करण्यात आली आहे. पाेलिसांनी उल्हासनगर येथून अनिक्षा जयसिंघानी हिला ताब्यात घेतलं आहे. अमृता फडणवीस  यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. या तरुणीला सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात आणून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यावेळी त्यांची मुलगी डिझायनर अनिक्षा आणि मुलगा अक्षन दोघेही घरात होते. यावेळी दोघांनीही पोलिस चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला. अलिल जयसिंगानी याचा मुलगा अक्षन याने प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल झाला असल्याचा दावा केला आहे.  तर मुलीने आपल्या परीक्षा सुरू असल्याचा दावा केला आहे.
 
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली आहे. “डिझायनर अनिक्षाने याआधीही मला आणि माझ्या  कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अनेकदा धमक्याही देण्यात आल्या होत्या. मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
काय म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी?
“अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिल जयसिंगानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्या व्यक्तिवर 14 ते 15 गुन्हे आहेत. अनिल जयसिंगानी यांची एक मुलगी आहे. ही मुलगी 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर तिचे भेटणे बंद झाले होते. मात्र, अचानक पुन्हा 2021 नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरु केली. या मुलीने मी डिझायनर आहे, माझा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले. तसेच प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत माझं नाव आल्याचे  त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतले. या माध्यमातून त्या डिझायनर असलेल्या मुलीने आत्मविश्वास संपादन केल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्या मुलीने येणं जाणं सुरु केलं. यातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
काय आहे प्रकरण?
 
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये  20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरातने दिल्लीवर 11 धावांनी मात केली