राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणात नवी माहिती उघड केली आहे. कोणत्या नेत्यांचे फोन टॅप झाले याबाबत त्यांनी माहिती दिली.
त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने त्यांच्या फोनचं टॅपिंग करण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
फोन टॅपिंग प्रकरणात महाविकास आघाडी सरकार कारवाई करत आहे. त्याअंतर्गत पुण्यातील तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबरच बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.
पटोले यांचा नंबर अमजद खान, बच्चू कडू यांचा नंबर निजामुद्दीन बाबू शेख, तर संजय काकडे यांचे दोन नंबर परवेज सुतार आणि अभिजीत नायर आणि आशिष देशमुख यांचे रघू सोरगे आणि महेश साळुंखे या नावाने दाखवत त्यांचे कॉल टॅप केले होते.