गोंदियातील मुद्दा हा स्थानिक पातळीवरचा आहे. नाना पटोले यांनी आपले शत्रू कोण आहेत हे ओळखायला पाहिजे. त्यांनी जबाबदारीचे वक्तव्य करायला हवे, असा सल्ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने युती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होते. नाना पटोले यांच्या वक्तव्यावर गृहमंत्र्यांनी माध्यमांशी बोलतांना खुलास केले. ते म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्र लढवयला हवी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले शत्रू ओळखणे शिकायला पाहिजे.
पुण्यात भाजप कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण झाली. याविषयावर बोलतांना दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. कायद्याप्रमाणे निर्णय होईल. भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई झाली. दुसऱ्या बाजूचे लोक दोषी असतील तर त्याच्यावरही कारवाई होईल, असेही गृहमंत्री म्हणाले.