नाशिक : राज्यातील अनेक संवेदनशिल खटल्यांमध्ये सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला आहे . श्रीरामपूर वरून कामकाज आटोपून समृदधी महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना भरवीर फाट्यावर सदरचा अपघात घडला.ॲड. मिसर यांच्या ताफ्यात बाहेर वाहन घुसल्याने अपघात घडला असून, यात ॲड मिसर यांच्यासह तिघे थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष सरकारी वकील अजय मिसर हे न्यायालयीन कामकाजा निमित्ताने श्रीरामपूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर त्यांचा ताफा समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाला होता. ॲड. मिसर यांच्याकडे पीएफआयसह अनेक संवेदनशिल खटल्याचे कामकाज पहात असल्याने त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. पायलट वाहन आणि एस्कॉर्ट वाहनाच्यामध्ये ॲड. मिसर यांचे सफारी चारचाकी वाहन (एमएच 01 सीपी 1618) जात होेते.
समृद्धी महामार्गावरील भरवीर फाट्यानजिक त्यांच्या पायलट वाहन आणि ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या मधे खासगी वाहन घुसल्याने सदरचा अपघात घडला. यावेळी ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
या वाहनात ॲड. मिसर यांच्यासह चालक व त्यांचा सहकारी वकील होते. यात त्यांच्या वाहनाची (एमएच 01 सीपी 1618) समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले आहे. तर, ॲड. मिसर यांच्या खांद्यासह चेहर्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार करून ॲड. मिसर दुसर्या वाहनाने नाशिकला परत येत असल्याची माहिती त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी दिली.
Edited By - Ratnadeep Ranshoor