नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, की संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे आणि त्याचा फटका हा सरकारला बसेल, असा आतापर्यंत नागरिकांचा कल असल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आले होते नाशिकमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले, नाशिक व दिंडोरीचे जागावाटप झाले असून, आम्ही आमचा उमेदवार या ठिकाणी लवकरच घोषित करू. महाविकास आघाडीमधील जागावाटप लवकरच घोषित होईल, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. केंद्र सरकारची नीती ही धरसोड वृत्तीची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. कांदा व ऊस यासह अन्य पिकांना या वृत्तीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे असे सांगून शरद पवार पुढे म्हणाले की या सर्व गोष्टींचा फटका हा केंद्र सरकारला येणाऱ्या निवडणुकीत बसेल, असा अंदाज नागरिकांशी बोलताना येत आहे. एकूणच संपूर्ण देशामध्ये नागरिकांचा कल हा केंद्र सरकार विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Edited By - Ratnadeep Ranshoor