विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झालीय. यामध्ये नाशिक, अमरावती या दोन पदवीधरच्या जागांसाठी आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपकडून पाच जागांच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कोकण शिक्षक मतदारसंघासाठी, रणजीत पाटील यांची औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी तसेच किरण पाटील यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.
काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. आता काँग्रेसचा सत्यजित तांबेंना पाठिंना नसेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली.
डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले होते.
काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म दिला होता, पण त्यांनी अर्जच भरला नाही.
नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही या साठी महत्त्वाची बैठक मातोश्रीवर होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले गेले. सुधीर तांबे यांनी अखेरच्या दिवशी अर्ज भरला नाही. आता सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा न देण्याचे निर्णय घेतल्यावर कोणत्या अपक्ष उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार या कडे लक्ष लागले आहे.