Nashik Kalikamata temple यंदाच्या नवरात्रोत्सव काळात नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात भाविकांच्या गर्दीचा दिवसेंदिवस वाढणारा ओघ लक्षात घेता यंदा कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू ठेवण्याचेही संस्थान व्यवस्थापनाचे नियोजन आहे.
विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या धर्तीवर यंदाच्या नवरात्रोत्सवात पेड पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्णय मंदिर संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला
नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी आणि आढावा बैठक मंदिराच्या सभागृहात पार पडली. संस्थानचे अध्यक्ष केशवराव तथा अण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे यांच्यासह विश्वस्त आणि परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक वाहतूक आयुक्त सचिन बारी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापक संचालक आवेश पलोड आदी उपस्थित होते.
यंदा नवरात्रोत्सव १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. भाविकांची वाढती गर्दी विचारात घेता यंदा उत्सवास आणखी मोठे स्वरूप देऊन कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
हे ही वाचा: नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग
पेड दर्शनासाठी प्रति भाविक आकारणार १०० रुपये शुल्क:
पेड दर्शन ही केवळ बाहेरगावी जाणाऱ्या किंवा अन्य कारणाने घाईत असणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा आहे. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांना पुढील प्रवासाची घाई असते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे दर्शनासाठी रांगेत दीड-दोन तास उभे राहणे अशक्य होते. त्यांच्यासाठी प्रति भाविक १०० रुपये शुल्क घेऊन पेड दर्शन पास उपलब्ध करून दिला जाईल.