Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक : तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळांनी दिला सल्ला

नाशिक : तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील, छगन भुजबळांनी दिला सल्ला
, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (20:26 IST)
नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी एकदिवसाच्या नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांच्या उपस्थितीत कळवण  येथे शेतकरी कृतज्ञता मेळाव्यासह विविध कार्यक्रम होत आहेत. नुकताच अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कळवणला शेतकरी कृतज्ञता मेळावा पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळ  यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर काय करावे लागेल याबाबत कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक सल्ला दिला आहे...
 
यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, आम्ही सत्तेत का गेलो याचे कारण वारंवार संगितले जाते.आम्हीच नाही तर तुमच्यासोबत (शरद पवार गट) असलेल्या अनेक लोकांनी तेच सांगितले. सगळे आमदार आणि खासदार  आमच्यासोबत आहेत. एक आमदार ३ लाखांचा प्रतिनिधी आहे. न्यायाचा तराजू अजितदादांच्या बाजूने सुटणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४५ आमदारांचे संख्याबळ आहे. ते वाढवून आपल्याला ८० ते ९० आमदार वाढवावे लागतील. त्यानंतरच अजितदादा मुख्यमंत्री होतील. त्यामुळे जिथे-जिथे निवडणुका  होतील तिथे-तिथे अजितदादांचे लोक निवडून आले पाहिजेत. त्याची जबाबदारी आता तुम्हाला-मला उचलायला पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.
 
तर मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्याला कुणाचाही विरोध नाही. केवळ इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. अशीच सर्वांची भूमिका आहे. तरीही मला टार्गेट केलं जात आहे. एकमेकांची डोकी भडकवण्याचे काम कुणी करु नये. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालते. त्यामुळे याठिकाणी जातीवादाला थारा नाही, असे म्हणत भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले.
 
तसेच सध्या कांद्याचा प्रश्न निर्माण झाला असून यात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे  नुकसान होत आहे. म्हणून कांदा मार्केट सुरू करण्यासाठी मी अजितदादा आणि पियुष गोयल यांनी प्रयत्न केले. मार्केट बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. जे उगवतो ते विकू शकलो नाहीतर त्याचा उपयोग नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यांसोबत बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले.






Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक :अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदा, टोमॅटो फेकले (फोटो)