पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील मोडाळे व दरी ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींचे कौतुक करण्यात येत आहे.
देशपातळीवर (दि. २४) हा दिवस पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने मा. प्रधानमंत्री देशातील सर्व नागरिकांना वेबिनारद्वारे संबोधित करणार आहे. या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था व ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती मोडाळे ता.इगतपुरी, दरी ता. नाशिक या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. सदर बक्षिसाची रक्कम PFMS द्वारे थेट ग्रामपंचायतींना वितरित होणार असल्याचे सांगितले आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या मोडाळे आणि दरी या गावांचे परिसरात कौतुक होत आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पंचायती राज दिवस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आवश्यक असल्याने खालील वेब लिंक नोंदणी करावी आणि २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजता नियोजित राष्ट्रीय पंचायती राज दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी केले आहे.