Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गिर्यारोहकाने लावला कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे अप्रकाशित लेणीचा शोध

गिर्यारोहकाने लावला कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे अप्रकाशित लेणीचा शोध
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:21 IST)
गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी सहकारी गिर्यारोहकांसोबत औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील जामडीघाट येथे थापला नामक लेणीचा शोध घेतला. सदर शोधमोहिम ही तमाम महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना असून राज्यातील पुरातत्त्वात एका लेणीची भर पडली आहे. थापला डोंगरावरील लेण्यांबद्दल याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती तसेच हे स्थळ अप्रकाशित होते. या शोधकार्यात सुदर्शन कुलथे यांच्याबरोबर नाशिकचे दुर्ग संशोधक गिरीश टकले, राहुल सोनवणे आणि हेमंत पोखरणकर यांचा विशेष सहभाग राहीला. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जामडी गावातील विनोद चव्हाण यांचे सहकार्य झाले.
 
कन्नड या तालुक्याच्या ठिकाणाहून पश्चिमेकडे अगदी १२ कि.मी. अंतरावर जामडी घाट गाव आहे. बंजारा समाज बहुल या भागात सुरपाळनाथ या प्रसिध्द पर्वताशेजारी असलेल्या चुंडी-थापला नावाचा डोंगर आहे. उंच टोक असलेल्या भागाला ‘चुंडी’ तर सपाट भागाला ‘थापला’ अशी स्थानिक बंजारा भाषेतील नावे आहेत. त्यापैकी सपाट थापला भागावर लेणी आढळून आली आहे. याचे भौगोलिक स्थान 20.252447, 75.051760 असून उंची समुद्रसपाटीपासून २८०५ फूट (८५५ मी.) असून माथ्याचे क्षेत्रफळ सुमारे २.४० एकर एवढे भरते.
 
थापलाच्या चढाई मार्गावर कोरीव पायऱ्यांचे अवशेष दिसून येतात. माथ्याला पूर्व टोकावरून दुसरा मार्ग आहे. हा मार्ग थोडा अवघड असून उभ्या खडकांवर चढताना आधारासाठी कोरीव खाचे दिसून येतात. माथ्यावर दक्षिण टोकावर चिंचोळ्या भागावर काही ठिकाणी गोलाकार कोरीव खळगे आढळतात. उत्तर दिशेकडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी असल्यासारखा आयताकृती खोदीव भाग आहे. त्यात आत उतरण्यासाठी मोठ्या कोरीव पायऱ्या असून खाली गेल्यावर पश्चिम भिंतीत कोरीव गुहा आहे. उत्तर भिंतीत पुन्हा तीन खांब असलेली गुहा आहे. यात पाणी साठलेले आहे.पुढे साधारण थापला माथ्याच्या मध्यभागी अजून एक खोलगट खोदीव लेणी आहे. त्यात तळघरासारखी भली मोठी खोली दिसून येते. ही एक विहार लेणी आहे.
 
गुहेला आधार असावे असे अनेक खांब कोरलेले आहेत. कोरीव कोनाडे आहेत. या खोदीव विहारात सुमारे वीस लोक उभे राहू शकतात. आत दगड आणि मातीचा थर साचलेला दिसतो. या लेण्यांवर मूर्तीकाम नाही. फक्त विहार आहेत. थापला डोंगरावरील पाण्याच्या टाकी सदृश्य प्रकारच्या आंत खाली उतरून तळघरासारखी लेणी/विहार रचना बघता अशी रचना इतर कुठेही सहसा आढळत नाही हे याचे वैशिष्ट्य होय. थापला गडमाथ्याच्या साधारण मध्यभागीच पाण्याच्या टाक्यांसदृश्य समुहच दिसून येतो. हा भाग मोठा असून याची एकूण लांबी ७३ फूट तर रूंदी ४२ फूट आहे. त्यातील खडकात कोरीव दगडी भिंती ठेवून त्यातील टाके वेगवेगळे केलेले दिसून येतात तसेच भिंतीच्या बाजूने पुन्हा खोलगट गुहा कोरलेल्या आहेत.
 
या टाकी समुहाच्या बाजूलाच एका खोदीव पण मातीने बुजलेल्या भागात हल्ली बांधलेले हनुमान आणि शंकराची पिंड असलेले मंदिर आहे. मंदिराला लागून थापला माथ्याचा सर्वोच्च भाग असून संपूर्ण चौकोनी वास्तूचे जोते आहे. याचे कोरीव चीरे अजूनही दिसून येतात. त्यावर ध्वजस्तंभ आहे. गडमाथ्यावरील पश्चिम कडेवर सलग असलेल्या तटबंदीचे जोते दिसून येते. जामडीच्या थापलापासून उत्तरेकडे पितळखोरे लेणी (पाटनादेवी, कण्हेरगड) तर पश्चिमेकडे पेडका किल्ला असे दोन्ही दिशेला सरळ रेषेत ९ कि.मी. अंतरावर आहेत. तसेच वेरूळच्या जगप्रसिध्द लेणी सरळ रेषेत २८ कि.मी. अंतरावर आहेत. परिसरातील पितळखोरा लेणी, पाटणादेवीच्या कण्हेरगडाच्या पोटातील लेणी, औट्रम घाटातील मल्हारगडाला असलेली लेणी आणि टाकी, लोंझा आणि अंतुर किल्ल्यांवरील लेणी, सुतोंडा किल्ला आणि रूद्रेश्वर लेणी, घटूरथ (घटोत्कच) लेणी ते थेट अजिंठा पर्यंत अनेक ठिकाणी लेणी दिसून येतात.
 
जामडीच्या आजूबाजुला असलेल्या सह्याद्रीच्या अजिंठा रांग परिसरातून प्राचीन व्यापारी मार्ग जात होते. जातेगाव, पेडका, कण्हेरगड, मल्हारगड, अंतूर, देवगिरी असे किल्ले बघता या किल्ल्यांच्या मधील मोकळ्या पठारावर असलेल्या स्थानामुळे येथील लेण्यांचा कालांतराने चौकीचा किल्ला म्हणून उपयोग झालेला असावा. लेणी व्यतिरिक्त पायऱ्या, तटबंदी, चौथरा सारखे जोते, पाण्याची टाकी असे सर्व अवशेष बघता या ठिकाणी किल्ल्याच्या खूणा दिसून येतात. त्यावर अधिक संशोधन करण्यास वाव आहे.
 
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. श्री. तेजस गर्गे म्हणाले की, ‘जामडीच्या थापला किल्ल्यावरील लेणी ह्या देवगिरी-दौलताबाद परिसरात आढळणाऱ्या लेण्यांच्या भागातच आहेत. थापला लेणी सुमारे ११-१२ व्या शतकातील असून वेरूळची हिंदू-जैन लेण्यांच्या काळातील असण्याचा तर्क आहे. आहे. यावर उत्खननास भरपूर वाव आहे. या लेणी मध्ययुगात वापरात असतील तसेच नंतरच्या काळातही चौकी पहाऱ्याचा किल्ला म्हणून याचा उपयोग झाला असण्याची शक्यता वाटते. हा एक महत्त्वपूर्ण शोध असून महाराष्ट्र पुरातत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त आहे.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समीर वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय ड्रग सप्लायरशी मैत्री; मलिकांचे आणखी आरोप