Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल

hasan mushrif
, सोमवार, 11 एप्रिल 2022 (15:28 IST)
राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहेत. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 (पडताळणी वर्ष 2020-21) करिता सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली असून पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहाता (जि.अहमदनगर) आणि मालवण (जि.सिंधुदुर्ग) पंचायत समित्यांची निवड करण्यात आली आहे. 

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस आणि ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2022 हा राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी दिली.

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात मोदाळे (ता.इगतपुरी, जि.नाशिक), लोहगाव (ता.राहाता, जि.अहमदनगर), लोणी बुद्रुक (ता.राहाता, जि.अहमदनगर), कोतावडे (ता.कडेगाव, जि.सांगली), वाघोली (ता.मोर्शी, जि.अमरावती), बावी (कौल) (ता.जि.उस्मानाबाद), धारुर (ता.जि.उस्मानाबाद), शिरगाव (ता.कडेगाव, जि.सांगली), दरी (ता.जि.नाशिक),  नेरी (ता.मोहाडी, जि.भंडारा), श्रृंगारवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर), नन्व्हा (ता.सालेकसा, जि.गोंदिया), धोरोशी (ता.पाटण, जि.सातारा), झरी (ता.लोहा, जि.नांदेड), आरे (ता.गुहागर, जि.रत्नागिरी), मुठेवडगाव (ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), आणि खानापूर (ता.जि.उस्मानाबाद) या 17 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
 
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये, राहाता (जि. अहमदनगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि 17 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट खात्यात प्राप्त होईल, बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असून ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील लोहगाव या ग्रामपंचायतीस मिळाला आहे. या श्रृंगारवाडी आणि लोहगाव ग्रामपंचायतीस प्रत्येकी 5 लाख रूपये थेट प्राप्त होतील. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या भंडारवाडी या ग्रामपंचायतीची नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस 10 लाख रूपये रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट प्राप्त होईल,
 
पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे कोणत्याही एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजर राहून पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या कार्यास प्रोत्साहन देणार असल्याचे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले. त्याचबरोबर या पुरस्काराची रक्कम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.मुश्रीफ यांनी दिली आहे.
 
राज्याला उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार, उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरस्कारप्राप्त सर्व जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, पंचायत समित्यांचे सभापती-पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सर्व संबंधित पदाधिकारी अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही यंदाच्या वर्षी हे पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने विविध योजना, उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी अंमलबजावणी करुन आदर्श कामगिरी करावी, असे आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार