माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंढे यांनी येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेला कोल्हापूरजिल्ह्यातून सुरुवात झाली.
धनंजय मुंढे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली. सरकारने खाती उघडली, पण अजून १५ लाख जमा केलेले नाहीत. पेट्रोल, डाळ, गॅस आमच्यावेळी स्वस्त होते, मात्र आज पेट्रोल ६० चे ९२ रुपये झाले. ४०० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. गॅसच्या एका टाकीमागे ६२५ रुपये लुटले, तेही दिवसाढवळ्या. देशातील अन्य राज्यांनी तसेच फ्रान्सनेही ५७० कोटीला एक अशी विमाने खरेदी केली. तर भारताने १६७० कोटी रुपयांना एक अशी ३६ विमाने खरेदी केली. जुन्या कंपनीची स्पेअर पार्ट पुरवण्याची आॅर्डर बदलून ती अनिल अंबानी यांना दिली, अशा शब्दात राफेल करारावर मुंढे यांनी टीका केली. याबाबत गुन्हा नोंद होईल म्हणून चांगल्या अधिकाऱ्यांची रात्री दोन वाजता बदली केली, अशी टीका मुंडे यांनी केली.