Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू, काय असतात निपाहची लक्षणं?

निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू, काय असतात निपाहची लक्षणं?
, सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (13:00 IST)
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच केरळमध्ये चिंता वाढवणारी अजून एक बातमी समोर आली आहे. कोझिकोडमध्ये रविवारी (5 सप्टेंबर) 12 वर्षांच्या एका मुलाची निपाह विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
 
वृत्तपत्रातील बातमीनुसार अजून दोन जणांना निपाहचा संसर्ग झाल्याचंही स्पष्ट झालं आहे.
 
मे 2018 मध्ये पहिल्यांदा केरळमध्ये निपाह विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले होते. त्यावेळी निपाहमुळे 17 जणांना प्राण गमवावे लागले होते.
 
केरळमध्ये निपाहचे रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)ची एक टीम राज्याच्या आरोग्य विभागाला तांत्रिक सहकार्य देण्यासाठी रवाना झाली आहे.
 
केरळच्या आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सर्व खबरदारी घेत असल्याचं म्हटलं आहे.
 
काय आहे निपाह?
निपाह व्हायरस (NiV) हा एक नव्याने निर्माण होत असलेला इन्फेक्शनरूपी आजार आहे.हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. यावर उपचार म्हणून सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 70 टक्के असते.
 
1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुकरांशी संपर्क येणाऱ्या शेतकऱ्यांना मेंदू आणि श्वसनासंदर्भात गंभीर आजार झाले होते. त्यावेळी तीनशे माणसांना या आजाराने ग्रासलं होतं आणि शंभर जणांचा मृत्यू झाला होता.
 
या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी त्या वेळी मलेशियात लक्षावधी डुकरांना मारण्यात आलं. यामुळे मलेशियातील शेतकरी उद्योजकांचं प्रचंड नुकसान झालं.
 
ताप, डोकं दुखणं, अशक्त वाटणं, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणं या आजाराच्या शक्यता आहेत. ही लक्षणं दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो.
 
निपाह (Nipah)व्हायरसवर उपचार म्हणन अद्याप लस नाही. तोवर आजारी डुकरं, वटवाघुळं यांच्याशी संपर्क टाळणं हाच या आजारावरचा उपाय आहे.
 
'निपाह' व्हायरस पसरण्याची कारणं?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,
 
•'निपाह' व्हायरसचा संसर्ग वटवाघूळं आणि डुकरांपासून माणसांना होतो.
 
•एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते.
 
•फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवाघूळं 'निपाह' व्हायरसचे नैसर्गिक वाहक असतात.
 
वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड सांगतात, "निपाह व्हायरस वटवाघुळांच्या लाळेमध्ये असतो. वटवाघुळांनी खालेल्ली उष्टी फळं माणसांनी खाल्ली, तर व्हायरस आपल्या शरीरात जातो. त्यामुळे झाडाखाली पडलेली उष्टी फळं खाऊन नयेत."
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, वटवाघूळांची लघवी किंवा लाळेने दुषित झालेली फळं किंवा फळांचे पदार्थ खाल्याने निपाह व्हायरसचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता असते.
 
'निपाह' संसर्गाची लक्षणं काय?
नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. राहुल तांबे सांगतात,"ताप,डोकेदुखी,कफ,घसादुखी आणि श्वास घेण्यात अडथळा ही निपाह संसर्गाची लक्षणं आहेत."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते.
 
निपाहचा विषाणू शरीरात गेल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी 4 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. RT-PCR टेस्ट करून निपाह व्हायरस संसर्गाचं निदान करण्यात येतं.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आधी मुलीला गळफास, मग पती-पत्नीनं आत्महत्या केली