शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्यावर पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचे निधन झाले. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केलं जात आहे. नीतीन गडकरी यांनी देखील विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्या अवकाळी जाण्यानं महाराष्ट्राला मोठं नुकसान झालं आहे. विनायक मेटे यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .