नाशिक शहराने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलारिस रिन्यूएबल सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड कंपनी शहरात सुमारे दीडशे इलेक्ट्रिक चार्जिंग पाईट उभारणार असून यातील पहिले चार्जिंग पाईट कार्यान्वित झाले आहे. सदरच्या चार्जिंग पाईटवर येत्या १५ फेब्रुवारीपर्यत मोफत चार्जिंगची सवलत देण्यात आली आहे. हे चार्जिंग पाईट बॉईस टाऊन स्कूल,विसे मळा या ठिकाणी श्री अथर्व ईलेक्ट्रिक्स यांच्या साहाय्याने उभारण्यात आले आहे. या चार्जिंग पाईटचे उद्घाटन नगरसेवक समीर उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करून करण्यात आले.
वाढता इंधन खर्च आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे खासगी विद्युत वाहनांचा वापर वाढतांना दिसत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाहनचालकांना चार्जिंग पाईटची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होणार आहे. यासाठी शहरात चार्जिंग पाईटचे जाळे असणे लाभदायक ठरणार आहे. यासाठी पोलारीसने पुढाकार घेतला आहे. शहर विकासात अशाप्रकारचे चार्जिंग पाईट महत्वाचे ठरणार असल्याचे कांबळे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सांगितले.
पोलारिसचे संचालक पुष्कर पंचाक्षरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, येत्या मार्च अखेरपर्यत दीडशे चार्जिंग पाईटची उभारणी केली जाणार आहे. शहरातील सर्व मुख्य परिसरात ही उभारणी केली जाईल. या माध्यमातून राज्यात सर्वात प्रथम चार्जिंग पाईटचे नेटवर्क तयार करायचा आमचा प्रयत्न आहे. सध्या शहरात चार्जिंग पाईटची संख्या अत्यंत अल्प आहे. त्यामुळे नागरिक वाहन खरेदी करतांना पटकन इलेक्ट्रिक वाहनाचा विचार करत नाही. हीच अडचण दूर करायची आहे. जेणेकरून लोक इलेक्ट्रिक वाहन वापराकडे वळतील. पर्यायाने प्रदूषण कमी होईल. यावेळी स्वप्नील ताजानपुरे, कुवर गुजराल, श्रेयस पाध्ये, निलेश झांबरे यांच्यासह पोलारीसची संपूर्ण टीम उपस्थित होती