मुंबई : ऑगस्ट सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच विभागातील धरणं तळ गाठू लागली आहेत. परिणामी राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या राज्यातील धरणातील साठा 64.75 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या वर्षी या वेळी 84.84 टक्के जलसाठा होता. पुढील एक आठवडा राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यातील पिण्याची पाण्याची वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे.
तर राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. राज्यात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 16 धरणं काठोकाठ भरली होती.
पावसाचा जोर कमी असल्याने राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये पाणीस्थिती गंभीर बनली असून मागील वर्षी यावेळी उजनी धरण आत्तापर्यंत 100 टक्के भरलं होते. त्याच उजनी धरणात यंदा फक्त 17.54 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाड्यातील जलसाठ्यांची गंभीर स्थिती आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत यंदा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जायकवाडीत 94 टक्के पाणीसाठा होता आहे. लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यांची गंभीर परिस्थिती आहे. भुसानी सोडता एकाही जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नाही. भुसानीत आज 52.35 टक्के पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सिध्देश्वर आणि येल्दारी धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मात्र यंदा सिध्देश्वर धरणात 46 टक्के तर येलदारीत 60 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
विदर्भात धरणांमध्ये पाणीसाठा कमी
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व विभागांतील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. विदर्भातील धरणांमध्ये सरासरी पाणीसाठा आहे. परिस्थिती गंभीर नसली तरी पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. बुलढाण्यात मात्र यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह आहे. खडकपूर्णा धरणात फक्त चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मागच्या वर्षी खडकपूर्णा धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. नळगंगा धरणात 26 टक्के पाणीसाठा तर पेनटाकळीत 49 टक्के जलसाठा शिल्लक आहे. पावसाचा जोर कमी असल्याने राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये पाणीस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही तर राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची दाट आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor