पेटीएम अॅप अद्ययावत करण्याच्या बतावणीने सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. येरवडा भागातील एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ महिलेकडे अशाच प्रकारची बतावणी करुन चोरटय़ांनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवडाभरापूर्वी प्रभात रस्ता भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली होती.
याबाबत ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात ४ फेब्रुवारी रोजी अज्ञाताने ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पेटीएम अॅपची मुदत संपली असून तातडीने अद्ययावत न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी चोरटय़ाकडून त्यांच्याकडे त्या वेळी करण्यात आली होती. त्यानंतर चोरटय़ाने तक्रारदार महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करुन चोरटय़ाने त्यांच्या खात्यातून १ लाख रुपये लांबविले. याबाबत ज्येष्ठ महिलेने नुकतीच तक्रार दिली असून माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अजय वाघमारे तपास करत आहेत.
पेटीएम अॅप अद्ययावत करण्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गेल्या दीड महिन्यात १६५ हून जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. चोरटय़ांनी बतावणी करून सामान्यांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
संदेशाकडे दुर्लक्ष करा; सायबर पोलिसांचे आवाहन
पेटीएम अॅप अद्ययावत करायचे असून माहितीसाठी नमूद क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा,अशी बतावणी करणारे संदेश मोबाईलधारकांना गेल्या काही दिवसांपासून चोरटय़ांकडून पाठविले जात आहेत. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांचे सुशिक्षितही बळी ठरत आहेत. संदेशातील इंग्रजी शब्द चुकीचे असूनही तक्रारदार चोरटय़ांच्या जाळ्यात सापडत असल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होण्याची शक्यता असून मोबाईलधारकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच एनी डेस्क, टीम व्ह्य़ूअर, क्विक सपोर्ट यांसारखे मोबाईल अॅप डाऊनलोड करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.