पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाला राज्याचे वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला होता. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात लक्ष घालत या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आणि घटनेचा पूर्ण अहवाल महिला आयोगाला पाठविला आहे. अहवालाची एक प्रत पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना देखील पाठविण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. परंतु अहवालात काय पाठविण्यात आले याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली.
राजकीय आरोप होत असतानाच यात राष्ट्रीय महिला आयोगाने लक्ष घालून पुजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पाठविण्याचे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना दिले होते. राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करत या प्रकरणी दखल घेण्याची विनंती केली होती.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी यात लक्ष घालत पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. रेखा शर्मा यांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरीक्त पोलीस आयुक्तांना 13 फेब्रुवारी रोजी पत्र व्यवहार केला होता. या पत्र व्यवहारानंतर आजवर काय तपास करण्यात आला याचा अहवाल महिला आयोगाला मंगळवारी पाठविण्यात आल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.