राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व निर्बंधांमध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. अशामध्ये आता टोपे यांनी कोरोनाबाबत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे.
दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही, असं टोपे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात लसीकरणासाठी 'मिशन कवच कुंडल' मोहिम
महाराष्ट्राचा देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा. त्यासाठी आम्ही ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल योजना राबवणार आहे. दररोज किमान १५ लाख लसीकऱण झालं पाहिजे असं ध्येय आहे. लस उपलब्ध नसायची अशी परिस्थिती आता नाही. जवळजवळ ७५ लाख लशी उपलब्ध आहेत. सहा दिवसांत स्टॉक संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले की, आजपर्यंत लसीकरणाची टक्केवारी पाहता ६२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्राला ९ कोटी १५ लाख एवढंं एकूण उद्दिष्ट आहे. यापैकी ६ कोटी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आहे. ३ कोटी २० लाख लसीकरण झालं तर राज्यातील १८ वर्षांच्या सर्व नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण होईल. यामुळे लोकांना संरक्षण मिळेल. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही अडीच कोटींच्या घरात आहेत. ३० टक्के दोन डोस पुर्ण केले आहेत. उरलेले ३ कोटी डोस दिले तर तिसऱ्या लाटेची भीती कमी होण्यास मदत होईल.
महाराष्ट्राकडे कोरोना प्रतिबंधक लशीचे १ कोटी डोस आहेत. पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 62 टक्के आहे. लसीकरणाला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे यामुळे धोका कमी होईल. काही लोकांची काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायत आणि प्रभाग पातळीवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.
लोकांना जनजागृती करण्याचं काम आरोग्य विभाग करेलच. त्यासोबत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. सर्व पक्षाच्या लोकांना, लोकप्रिय व्यक्तींना जागरुक करण्याचं काम करा असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.