सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी, अन्यथा त्याच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करू, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी सचिन तेंडुलकरला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
सचिन तेंडुलकर भारताचा अभिमान आहे. ते करत असलेल्या जाहिरातींचा परिणाम लहान मुलांपासून थोरांपर्यंत होतो. त्यांच्या गेमिंगच्या जाहिरातीमुळे पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी. आम्ही त्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. अन्यथा त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान,कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. सचिन तेंडुलकर यांच्या पेटीएम फर्स्ट जाहिराती संदर्भात माझ्याकडे प्रितेश पवार यांची तक्रार आली आहे. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटर असून भारतात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ते करत असलेल्या जाहिरातींचा परिणाम लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत होतो. ते करत असलेली पेटीएम फर्स्टची जाहिरात जुगाराला प्रोत्साहन देणारी आहे. या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत आहे. त्यामुळे तेंडुलकर यांनी जुगाराला प्रोत्साहन देणाऱया गेम्सची जाहिरात करु नये. सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहिरात केली आहे. या प्रकरणी तेंडुलकर यांना राज्य सरकारने नोटीस पाठवून जाब विचारला पाहिजे, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली होती. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor