Accident on Samriddhi highway मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला आज (1 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यामधील 25 प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर 8 प्रवासी अपघातातून प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले.
सदर खासगी बस (वाहन क्रमांक MH 29 BE 1819) ही समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.
या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन ते फुटलं. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच बहुतांश प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अपघातात वाचलेल्या प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर प्रवेश मिळवल्याने त्यांना आपले प्राण वाचवता आले, अशी माहिती कडासने यांनी दिली.
मृतांची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. याबाबत तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे. तर जखमी प्रवाशांवर बुलडाण्यातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं.
अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये बसचा कोळसा झाल्याचं भीषण दृश्य फोटोंमधून पाहता येऊ शकतं.
अपघात होण्यापूर्वी काही तास आधी विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. यानंतर पुढे बुलडाण्याजवळ बसला अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.
अपघातातून वाचलेल्या प्रवाशांकडून पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला. एका प्रवाशाने सांगितलं, “मी छत्रपती संभाजीनगरला उतरणार होतो. एका तासात माझा स्टॉप येईल म्हणून मी उतरण्याची तयारी सुरू केली होती. तितक्यात गाडी पलटी होऊन मी आणि माझा मित्र खाली पडलो. तितक्यात आमच्या समोरचा प्रवासी काच फोडून बाहेर निघत असल्याचं आम्ही पाहिलं आम्हीही त्याच्या मागे निघालो. गाडीवरून उडी मारून आम्ही बाहेर पडण्यात यशस्वी झालो.
आम्ही बाहेर आल्यानंतर आमच्या मागेही काही प्रवासी आले. गाडी पलटी झाल्यानंतर लगेच आगीने पेट घेतला होता. पाहता पाहता आग वाढत गेली. प्रवाशांचा आक्रोश आम्ही ऐकला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो.”
दरम्यान, या अपघात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
Published By -Smita Joshi