पुण्यातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडाबळी, चारित्र्यावर संशय घेणे आणि बाळ आपले नसल्याच्या सततच्या आरोपाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
तिच्या मृत्यू नंतर तिचे बाळ चव्हाण नावाच्या कुटुंबमित्रांकडे होते. या घटनेची माहितीमिळाल्यावर त्यांनी ते बाळ बावधन पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. बाळ सुरक्षित असून ते बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने एक्स अकाऊंटवरून प्रतिक्रिया देत म्हटले आहे, वैष्णवी हगवणे यांचे बाळ वैष्णवीच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हगवणे कुटुंबातील तिघांना अटक केली असून दोघे अद्याप पसार आहे. बाळ राजेंद्र हगवणे यांच्या नातेवाईकांकडे होते कायदेशीर प्रक्रिया केल्यावर बाळाला वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळ हे राजेंद्र हगवणे यांच्या मावस भाऊ निलेश चव्हाण कडे दिले होते. वैष्णवीच्या सासू, नवऱ्याला, नणंदेला अटक केल्यावर हे बाळ चव्हाण यांच्या कडे होते. सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्यांनी हे बाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या नवऱ्याला, सासूला आणि नणंदेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार असून त्यांच्या शोध पोलीस घेत आहे.