पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर पाच जिल्ह्यांमध्ये महापुरामुळे २७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील तब्बल दोन लाख जणांना सुक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही सर्व माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
प्रशासनाकडून सुरू असलेले बचावकार्य हे पुरात अडकलेल्या अनेकजणांपर्यंत पोहचले नाही हे उघड होत आहे. अजूनही शेकडोजण आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. तर सरकारकडून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच आवश्यक त्या वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी परवानगी दिली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली अभूतपूर्ण पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.