दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात ८ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते ९ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, ८ जानेवारीला नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. ८ आणि ९ जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.