Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज ठाकरे : थर नाही लावायचे, तर मग खुर्चीवर उभं राहून दहीहंडी फोडायची का?

राज ठाकरे : थर नाही लावायचे, तर मग खुर्चीवर उभं राहून दहीहंडी फोडायची का?
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (12:39 IST)
गेल्यावर्षी दहीहंडी साजरा करण्यात आली नव्हती. पण गेल्या वर्षी आणि यंदा परिस्थिती वेगळी आहे. लॉकडाऊन आवडे सर्वांना असं झालंय. सभा, मोर्चे होऊ नये यासाठी ही दुसरी, तिसरी लाट आणली जात असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
दहीहंडी साजरा करण्याबद्दल सरकारने लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
 
जन आशीर्वाद यात्रा चालली, तेव्हा लॉकडाऊन नाही का, असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी म्हटलं की, सणांना लॉकडाऊन करत जनतेला घाबरवून सोडलं जातंय. म्हणून मी जोरात दहीहंडी साजरी करा असं सांगितलं.
 
सर्व सण साजरे झाले पाहिजेत, सर्वांसाठी नियम सारखे पाहिजेत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.दहीहंडीवरील निर्बंधांबद्दल टोला लगावताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, थर लावायचे नाहीत, तर खुर्चीवर उभं राहून दहीहंडी फोडायची का?
 
अनेक ठिकाणी मनसेची दहीहंडी
दहीहंडीवर निर्बंध असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सोमवारी (30 ऑगस्ट) रात्री तसंच मंगळवारी (31 ऑगस्ट) पहाटेच अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली.मानखुर्द, वरळी, दादर, पनवेल, मुलुंड आणि इतर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी 10-20च्या गटानं जमून दहीहंडी फोडली.पोलिसांनी आता मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.
 
मुंबईतल्या काळाचौकी परिसरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
 
भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपरमध्ये गोविंदा पथक दहिहंडीचे थर लावणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यांच्या घरी घाटकोपर येथे पोलीस पोहचले असून त्यांना पोलिसांनी घरीच स्थानबद्ध केलं आहे.त्यावर आमच्या घरी जेवढे पोलीस पाठवले आहेत तेवढे ठाण्यात त्या अधिकाऱ्याच्या सुरक्षेसाठी असते तर त्यांची तीन बोटं कापली गेली नसती, असं राम कदम म्हणालेत.
 
ते पुढे म्हणाले, "आम्ही कुठल्याही नियमांचा भंग करणार नाही. राज्य सरकारने नियम सांगावेत आम्ही त्याचं स्वागत करू. पण परंपरा मोडणार नाही. तुम्ही अन्य धर्माच्या लोकांसाठी अर्ध्यारात्री मंत्रालय सुरू करता मग आम्हाला का रोखता? दोन लस घेतलेल्या लोकांनाच आम्ही परवानगी देत आहोत. मग ठाकरे सरकारला काय हरकत आहे?"
 
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये पहाटेच्या सुमारास दहीहंडी फोडली. दहीहंडी नंतर महाविकासआघाडीची तुलना तालिबानीशी करत सरकारचा निषेधही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.
 
"काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिलं, हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ. संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं होतं.मात्र, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी करण्यावर ठाम होते.
 
ठाण्यात मनसेकडून दहीहंडी साजरी करण्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली होती. ठाण्यामधील भगवती मैदानावर या दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वतः रविवारी (29 ऑगस्ट) या तयारीचा आढावा घेतला होता.
 
त्यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं की, 'सरकारनं अजूनही परवानगी द्यावी.दोन थरांचा तर हा विषय आहे आणि वीस-पंचवीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी,म्हणजे आमचाही सण साजरा होईल.'
 
मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनीही आम्ही दहीहंडी साजरा करणार,सरकारनं त्यासंबंधी नियमावली जाहीर करावी. आम्ही त्याचं पालन करून सण साजरा करू अशी भूमिका त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केली होती. पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यावर कारवाई करत त्यांना सोमवारी (30 ऑगस्ट) ताब्यातही घेतलं होतं.
 
निर्बंध असतानाही दहीहंडी साजरी करण्यासाठी जमल्यास कारवाई केली जाईल,अशी नोटीसही पोलिसांकडून अनेक दहीहंडी मंडळांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे आज (31 ऑगस्ट) जन्माष्टमीला थरावर थर लागणार का हा प्रश्न आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकन सैन्याने अफगाण सोडतातच,तालिबानने विमानतळ काबीज केले