Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी : कंटेनमेंट झोनचे निकष बदलावे

राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी : कंटेनमेंट झोनचे निकष बदलावे
मुंबई , शुक्रवार, 12 जून 2020 (07:38 IST)
केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनसाठी तयार केलेल्या निकषांत बदल करावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. राज्यात कोरोना संसर्गाबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मनपा आयुक्त आय. एस. चहल, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
 
यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील उपाय योजनांबाबत माहिती दिली. तसंच कंटेनमेंट झोनसाठी जे निकष तयार करण्यात आले आहेत त्यात बदल करण्याची मागणी टोपे यांनी केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यामुळे राज्यातील पोलीस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांना आराम मिळावा. शिवाय हे पोलीस बळ अन्यत्र वापरता यावे यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस करावं. जेणेकरून १४ दिवसच कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्राकडून मार्गदर्शक सूचना पाठवण्यात याव्या, अशी मागणी टोपे यांनी यावेळी केली.
 
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५० टक्के
राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याची माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली. तसंच धारावीत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. यासह अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेव्हन हिल्स, सेंट जॉर्ज रुग्णालयात आठवडाभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती टोपेंनी दिली.
 
लोकल सेवा सुरू करावी 
मुंबईत आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची महत्त्वाची मागणीही टोपे यांनी केली आहे. दरम्यान, कोरोना व्यतिरिक्त क्षयरोग, पावसाळ्यातील साथीचे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत तुकाराम महाराज