Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

Rapid action team set up by health department after food poisoning in Loha taluk
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी, दि. 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून अहवाल सादर करावा, असे आदेश संचालक, पुणे, आरोग्य सेवा यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्यस्थितीत विषबाधेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 
 
कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळून आले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, शौचास लागणे अशी लक्षणे दिसून आल्यानंतर 600 रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड, 100 रुग्णांना श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, 150 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय लोहा, 20 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी, 150 रुग्णांना लोहा येथील खाजगी रुग्णालय  येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.
 
रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस,  महामंडळाची एक बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला आहे. रुग्णांना औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडार, जिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत.
 
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत या गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षणसाठी कार्यरत आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. नांदेडचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी हे पथकाचे प्रमुख असून  डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल, जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे.
 
याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत. विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आगामी लोकसभेच्या निवडणूक कामासाठी मुंबई महापालिकेत 7 हजार 500 अधिकार्‍यांची नेमणूक