परवानगीशिवाय मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या ठाकरे सरकारच्या रडारवर आहेत. मात्र, त्यांच्या बचावासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आता पुढे आले आहेत. राज्य सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती समोर येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातली तक्रार देवेंद्र फडणवीसांनी केलेलीच आहे. या चौकशीला तुमचा पाठिंबा असेल तर चौकशी होऊन द्यावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ते समोर येईल ना, मग आम्ही मान्य करू. पण चौकशी करायच्या अगोदरच निष्कर्षाप्रत येणार असाल तर अत्यंत घाईचं आणि चुकीचं ठरेल, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.