नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्यासंदर्भात अनेकांची नावे चर्चेत होती. यामध्ये अगदी पंकजा मुंडेंपासून रवी राणांपर्यंत सर्वांचा समावेश होता. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हनुमान चालीसावरून रान पेटवणारे रवी राणा यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार असं बोललं जात होतं. मात्र, त्यांचा समावेश न झाल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विटरवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठनाच्या मुद्द्यावरून जोरदार मोहीम उघडली होती. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हनुमान चालीसा पठन करण्याचा देखील त्यांनी घाट घातला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमवीर रवी राणा यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला.
यासंदर्भात ट्वीट करताना अमोल मिटकरी यांनी रवी राणा वैफल्यग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे. “हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले आहेत”, असं मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.